विधान परिषद 5 जागांसाठी आज मतदान 182 उमेदवार रिंगणात; सर्वत्र बंडखोरीची धास्ती पण ‘मैत्रीपूर्ण’ लढतचा मुलामा!

0

महाराष्ट्र राज्यात आज विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षकच्या पाच जागांसाठी शुक्रवारी मतदान होत आहे. परंतु राज्यात 2024 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये निर्माण झालेल्या आघाडीमुळे पारंपारिकपणे जागा लढणाऱ्या पक्षांमध्येच या पाच जागांसाठी एकमत न झाल्याने सर्वत्रच निर्माण झालेली ‘बंडखोरी’ ही खरी समस्या असतानाही अत्यंत चालाखीने याला ‘मैत्रीपूर्ण’चा मुलामा देऊन या निवडणुका पार पाडण्यात सर्वच पक्षांनी धन्यता मानली. मुख्य लढतीसह अन्य अपक्ष व प्रादेशिक पक्षांनीही उमेदवार दिल्याने आजच्या मतदानामध्ये 182 उमेदवार रिंगणात उतरल्याने निवडणुकीत कमालीची चुरस निर्माण झाली आहे.

राज्यातील सत्ताधारी पक्षांत झालेली बंडखोरी व पक्षांतर्गत नाराजीमुळे महायुतीच्या अधिकृत उमेदवारांची धास्ती वाढली आहे. राज्यातील सत्ताधारी महायुतीच्या उमेदवारांविरोधात ज्याप्रमाणे बंडखोरी झाली आहे त्याप्रमाणेच महाविकास आघाडीत काही मतदारसंघांतही बंडखोरीला आवर घालणं शक्य न झाल्याने सर्वमान्य अशा ‘मैत्रीपूर्ण’ चा मुलामा देऊन लढती करण्याकडेच सर्वांचा कल राहिला आहे. त्यामुळे या निवडणुकीत पसंती क्रमांकाच्या गणितामध्ये कोण बाजी मारणार? मतांचा कोठा गाठण्यास कोण यशस्वी होणार? कोण विजयी रथ गाठणार? कोणाचा टांगा पलटी घोडे फरार…! याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पुणे पदवीधरमध्ये चुरस

अधिक वाचा  पुणे विधानपरिषद आमचे दोन्हीही उमेदवार उच्चशिक्षित मोठ्या फरकाने विजयी होणार; गोकुळवरून चंद्रकांत पाटलांनी ट्रोलर्संनाही सुनावलं

राज्यात महायुतीचे पर्व सुरू झाल्यापासून चर्चेत असलेली पुणे पदवीधर मतदारसंघाची जागा मिळवण्यामध्ये भारतीय जनता पक्षाला यश आले. या जागेवर भारतीय जनता पक्षामध्ये निष्ठेने काम करणाऱ्या व महायुतीमुळे भाजप विषयी ममत्व निर्माण झालेल्या विद्यमान आमदारांचे सुपुत्र यांना संधी मिळण्याची शक्यता होती. दिल्लीवरून आलेल्या निर्णयामुळे डॉ. स्मिता जाधव या नव्या चेहऱ्याला पदवीधरांच्या घराघरात पोहोचवण्यासाठी भाजपला कसोटी करावी लागली आहे. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या हर्षदा देशमुख-जाधव प्रमुख उमेदवार आहेत (गेल्यावर्षीही या जागी शरद पवार यांनी अचानक अरुण लाड यांना उमेदवारी जाहीर करून विजयी केले होते). याच मतदारसंघात कोल्हापूर वाशी असलेले शिवसेनेचे सुनील मोदी हे रिंगणात उतरल्याने सर्वाधिक मते असलेल्या सांगली व कोल्हापूर भागातून उमेदवारी केल्याने येथे चुरशीचा सामना होण्याचा अंदाज आहे.

वरकरणी पुणे पदवीधर मतदारसंघ भारतीय जनता पक्षाला सहज सहकार करणे शक्य वाटत असले तरीसुद्धा कार्यरत आणि निष्ठावान चेहऱ्यांना डावलून नवख्या चेहऱ्याची अग्निपरीक्षा भारतीय जनता पक्षाला द्यावी लागणार आहे. भारतीय जनता पक्षाने त्यासाठी अत्यंत सचोटीने आणि कसोटीने जागा विजयी करण्याचा संकल्प केला आहे. पक्ष आदेश शिरस्थ मानून भारतीय जनता पक्षाची सर्व यंत्रणा त्यासाठी कामाला लागली आहे. महायुतीतील दोन प्रबळ इच्छुक उमेदवारांची बंडखोरी टाळण्यात यश आल्याने भारतीय जनता पक्षाला ही जागा सहज विजयी होईल अशी आशा वाटत आहे.

अधिक वाचा  पुणे पदवीधर, शिक्षक मतदारसंघ चंद्रकांतदादांचा पुण्यातही घरोघरी प्रचार; महायुतीचे दोन्ही उमेदवार विजयीचा निर्धार

पुणे शिक्षकमध्ये चौरंगी लढत

पुणे पदवीधर मतदारसंघाप्रमाणेच पुणे शिक्षक मतदारसंघातही भारतीय जनता पक्षाला विजयाची खात्री वाटत होती. त्यामुळे जागावाटपामध्ये आग्रहाने ही जागा पक्षाकडे मिळवण्यात यश आल्यानंतर भाजपकडून तरुण चेहरा कौस्तुभ गावडे (वय 30) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेसचे विद्यमान आमदार जयंत आसगावकर प्रमुख उमेदवार आहेत. या मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या मदतीने आपल्यालाच उमेदवारी मिळेल या आशेने गेली दोन वर्षे काम करणारे शिंदे गटाचे सचिन सानप आणि माजी आमदार दत्तात्रय सावंत हे राष्ट्रीय समाज पक्षाकडून निवडणूक लढवत असल्याने येथे चौरंगी लढतीची शक्यता आहे. महायुतीच्या मतदारांमध्ये तिहेरी विभागणी झाल्यामुळे ही जागा नक्की कोण जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नागपूरमध्ये फडणवीसांची प्रतिष्ठा पणाला

नागपूर पदवीधरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भाजपचे सुधाकर कोहळे आणि काँग्रेसचे विद्यमान आमदार अभिजित वंजारी यांच्यात येथे मुख्य लढत होत आहे. भाजपचे बंडखोर अनिल सोले यांनी लढतीतून माघार घेतली असली तरी त्यांचे नाव मतदान पत्रिकेवर असणार आहे. त्यामुळे भाजपमधील एक गट सोले यांच्या बाजूने कौल देऊन आपली नाराजी व्यक्त करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अधिक वाचा  ‘भाजपचा सत्ता-संपत्तीचा माज आत्ता बास सुशिक्षित स्वाभिमानी मतदार उतरवणार’; हर्षदा देशमुख-जाधव

मराठवाडय़ात अजितदादा गटापुढे आव्हान

सलग तीन वेळा संभाजीनगर पदवीधर मतदारसंघात निवडून येणाऱ्या अजित पवार गटाचे सतीश चव्हाण महायुतीकडून रिंगणात असले तरी शिंदे गटाच्या काही नेत्यांचा त्यांना विरोध आहे. भाजपच्या अंतर्गत विरोधाचा सामना करावा लागत असल्याने अजितदादा गटापुढे आव्हान निर्माण झाले आहे. राष्ट्रवादीकडून डॉ. प्रतापसिंग पाटील यांना उमेदवारी देण्यात आली असून शिवसेनेने दिलीप घुगेंना उमेदवारी दिली.

अमरावती शिक्षकमध्ये मतविभाजनाचा धोका

अमरावती शिक्षक मतदारसंघात महायुतीत बंडखोरी झाली असून महाविकास आघाडीतील मैत्रीपूर्ण लढत होत असल्याने मतविभाजनाचा धोका प्रमुख उमेदवारांना आहे. शिंदे गटाकडून विद्यमान आमदार किरण सरनाईक, कॉँग्रेसकडून आदिती पोहरे, शिवसेनेचे दत्तात्रय लहाने, शिंदे गटाचे बंडखोर माजी आमदार श्रीकांत देशपांडे यांच्यासह भाजप नेते अनिल बोंडे यांच्या भगिनी संगीता शिंदे रिंगणात असल्याने येथे चुरशीची लढत होईल.