पुणे : एसएनडीटी मेट्रो स्टेशन परिसरातील वाहतूक कोंडी आणि रस्त्यावरील अनधिकृत पार्किंगची समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी सिंचन विभागाच्या मालकीची विनावापर पडून असलेली जागा मेट्रो प्रवाशांच्या पार्किंगसाठी उपलब्ध करून द्यावी. यासाठी पुणे महानगरपालिकेने संबंधित विभागाशी तातडीने समन्वय साधून जागा भाडेतत्त्वावर घेण्याची प्रक्रिया सुरू करावी आणि पार्किंग विकसित करण्यासाठी कालबद्ध कृती आराखडा तयार करावा, अशी ठोस मागणी नगरसेवक तथा भाजप पुणे शहराचे महामंत्री पुनीत जोशी यांनी महापालिका आयुक्त श्री. नवल किशोर राम यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
एसएनडीटी मेट्रो स्टेशन परिसरात अधिकृत पार्किंगची पुरेशी सुविधा उपलब्ध नसल्याने मेट्रो प्रवासी रस्त्याच्या कडेला वाहने उभी करतात. त्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावतो, कोंडी निर्माण होते आणि नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. उपलब्ध जागेचा योग्य वापर न झाल्याने एका बाजूला जागा विनावापर पडून आहे, तर दुसऱ्या बाजूला पार्किंगअभावी वाहतुकीची समस्या तीव्र होत आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी महापालिकेने तातडीने निर्णय घेणे आवश्यक आहे.
महापालिका प्रशासनाने या मागणीवर तातडीने निर्णय घेऊन संबंधित विभागांशी समन्वय साधावा आणि प्रत्यक्ष पार्किंग सुविधा सुरू होईपर्यंतची कार्यवाही कालमर्यादेत पूर्ण करावी, अशी मागणी त्यांनी आयुक्तांकडे केली.



