‘भाजपचा सत्ता-संपत्तीचा माज आत्ता बास सुशिक्षित स्वाभिमानी मतदार उतरवणार’; हर्षदा देशमुख-जाधव

0

पुणे विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागलं आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवार हर्षदा देशमुख-जाधव यांनी भाजपवर जोरदार टीका करत विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. ‘भाजपचा सत्ता आणि संपत्तीचा माज सुशिक्षित मतदार उतरवतील. पुणे पदवीधर मतदारसंघात विजय आपलाच होणार,’ असा दावा त्यांनी केला. बेरोजगारी, रखडलेली शिक्षक भरती आणि शिक्षण क्षेत्रातील प्रश्न हे प्रचाराचे प्रमुख मुद्दे असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

‘दीड वर्षांपासून मतदारसंघात काम’

आपण ऐनवेळी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेलो नाही, असं सांगत हर्षदा देशमुख-जाधव यांनी गेल्या दीड वर्षांहून अधिक काळ मतदारसंघात काम केल्याचं म्हटलं. गावोगावी भेटी देऊन विद्यार्थी, तरुण आणि शिक्षकांच्या समस्या जाणून घेतल्याचा दावा त्यांनी केला.

अधिक वाचा  चंद्रकांतदादांच्या रणनीतीमुळे पुणे ‘शिक्षक’ची अशक्य जागा विजयी; पण सर्वत्र धुमधडाका करूनही ‘पदवी’मात्र मिळाली नाही

भाजपच्या उमेदवारीबाबतही त्यांनी टीका केली. महाविकास आघाडीची तयारी आधीपासून सुरू असून, सुशिक्षित मतदार सत्ताधाऱ्यांच्या दिखाऊ राजकारणाला बळी पडणार नाहीत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

बेरोजगारी आणि शिक्षक भरतीचा मुद्दा ऐरणीवर

पदवीधर मतदारसंघातील प्रचारात बेरोजगारी, शिक्षकांची रिक्त पदं आणि शिक्षण क्षेत्रातील प्रश्नांना प्राधान्य देणार असल्याचं देशमुख-जाधव यांनी सांगितलं. उच्च शिक्षण, व्यावसायिक अभ्यासक्रम आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या अडचणींकडेही लक्ष देण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांतील पदवीधरांच्या प्रश्नांना विधान परिषदेत आवाज देण्याचा मुद्दा महाविकास आघाडीकडून पुढे केला जात आहे.

अधिक वाचा  २-२-१ वारं फिरलं..! शिक्षक-पदवीधर निवडणुकीत राष्ट्रीय पक्षांना ‘कही खुशी कभी गम’चा धक्का; धक्कादायक अंदाज

‘गोकुळच्या निकालाची पुनरावृत्ती होणार’

कोल्हापूरमधील गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचा संदर्भ देत हर्षदा देशमुख-जाधव यांनी पुणे पदवीधर मतदारसंघातही महाविकास आघाडीला यश मिळेल, असा दावा केला. सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील आघाडीने गोकुळमध्ये महायुतीला पराभूत केल्याचा दाखला देत, मतदार पैशापेक्षा प्रामाणिक नेतृत्वाला महत्त्व देतील, असं त्या म्हणाल्या. महाविकास आघाडीचे प्रमुख नेते हर्षदा देशमुख-जाधव यांच्या प्रचारात सक्रिय असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, प्रत्यक्ष निवडणुकीत मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने लागतो, हे निकालानंतरच स्पष्ट होईल.

पदवीधर मतदारसंघात चुरस वाढणार?

भाजपच्या सत्ता-संपत्तीवर टीका करत हर्षदा देशमुख-जाधव यांनी सुशिक्षित मतदारांना बदलासाठी मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. बेरोजगारी, शिक्षक भरती आणि शैक्षणिक प्रश्नांवरून महाविकास आघाडी सत्ताधाऱ्यांना घेरण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे पुणे विभाग पदवीधर मतदारसंघातील निवडणूक प्रचारात आरोप-प्रत्यारोप आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

अधिक वाचा  राज्यात ‘अर्णब’ चक्रीवादळामुळं पाच दिवस पाऊस कोसळणार, या जिल्ह्यांना अलर्ट; गडचिरोली मुसळधारेचा इशारा