पुणे पदवीधर व शिक्षक विधानसभा मतदारसंघ दिवसेंदिवस अधिक कठीण परिस्थिती होत असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. देवेंद्र फडणवीस बुधवारी सकाळी पार पडलेल्या महत्त्वाच्या बैठकीत अधिकाऱ्यांवर संतापल्याचं वृत्त ताजं असताना आता पुण्यातून महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
शासन स्तरावर अधिकाऱ्यांना कामकाजासाठी झापल्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात आपल्या पक्षाच्या नगगरसेवकांची देखील शाळा घेतल्याची माहिती समोर येत आहे. मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. त्याचबरोबर इतर महत्त्वाच्या बैठका आटोपून देवेंद्र फडणवीस दुपारी पुण्याच्या दिशेला रवाना झाले.
पुण्यातील तळेगावातील एका खासगी कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला मंचावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, ज्येष्ठ नेते शरद पवार आणि माजी मंत्री जयंत पाटील हे देखील उपस्थित होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी जयंत पाटील आणि शरद पवार यांच्यासोबत बातचित केल्याचं कॅमेऱ्यात कैद झालं. हा कार्यक्रम आटोपल्यानंतर देवेंद्र फडणीस पक्ष संघटनात्मक कामाच्या बैठकीसाठी पुण्यात दाखल झाले.
फडणवीसांची नगरसेवकांसोबत बैठक
देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील सर्व भाजप नगरसेवकांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी भाजपच्या सर्व नगरसेवकांना चांगलंच खडसावलं. आपण प्रत्येकाचे रिपोर्टकार्ड तपासणार असल्याचं फडणवीसांनी बजावलं. यावेळी काही नगरसेवकांनी महापालिकेत सुरु असलेल्या कामकाजावरही नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर येत आहे.
फडणवीसांच्या बैठकीतील इनसाईड स्टोरी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुण्यातील बैठकीतील इनसाईड स्टोरी समोर आली आहे. विधानपरिषदेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यातील सर्वच नगरसेवकांची बैठक घेतली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी नगरसेवकांना कामाचा हिशेब स्पष्ट शब्दांत मागितला उद्या माझ्याकडे पद मागायला आलात, तर सर्वात आधी तुमचं रिपोर्ट कार्ड काढेन. तुम्ही किती आणि कसं काम केलं, याचा आढावा घेईन आणि त्यानंतरच पुढचा विचार करेन, असं देवेंद्र फडणवीस यांनी सर्व नगरसेवकांना बजावलं.
फडणवीसांच्या नगरेसवकांना सक्रीय होण्याच्या सूचना
कोकण विभागात 80 टक्के मतदान होतं, मग पुणे शहरात का होऊ शकत नाही? मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न करा. जास्तीत जास्त मतदान घडवून आणा, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी नगरसेवकांना सक्रिय होण्याचा संदेश दिला.
शिक्षक, पदवीधर निवडणुकीबाबत महत्त्वाच्या सूचना
जे काम करणार नाहीत त्यांचा रिपोर्ट मी स्वतः ठेवणार आहे. शिक्षक आणि पदवीधरमध्ये 80 टक्के मतदान झालं पाहिजे. दोन्ही जागांवर विजय झाला पाहिजे. शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीत सगळ्यांनी उपलब्ध व्हा. मतदारांपर्यंत जास्तीत जास्त पोहचा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी नगरसेवकांना दिल्या.
गृहमंत्री म्हणूनही यंत्रणा लावणार
यापुढील काळात आमदार, नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन केले जाणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. ‘गृहमंत्री म्हणूनही आणि माझी स्वतःची यंत्रणा लावूनही सर्वांचे रिपोर्ट कार्ड तयार करणार आहे,’ असा सूचक इशारा त्यांनी दिला.
नगरसेवकांनी मुख्यमंत्र्याकडे नाराजी व्यक्त
पुणे महानगरपालिकेतील कारभाराबाबत नगरसेवकांनी मुख्यमंत्र्यांसमोरच नाराजी व्यक्त केली. नगरसेवकांनी महापालिकेतील एककल्ली कारभाराविरोधात मुख्यमंत्र्यासमोर गाऱ्हाणं मांडलं. त्यांच्या या तक्रारीची दखल घेऊन मुख्यमंत्री काय पाऊल उचलतात? ते पाहणं देखील आता महत्त्वाचं असणार आहे.



