सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ८ टीएमसी पाणी आरक्षणाची मागणी; पालकमंत्र्यांच्या बैठकीकडे नाशिककरांच्या नजरा खिळल्या

0

नाशिक शहरासाठी पाणी आरक्षणाचे चक्र आज, गुरुवारी (दि. १५) संपुष्टात येत आहे. राज्यात सध्या दुष्काळाचे भीषण चित्र असतानाही सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ८ टीएमसी पाणी आरक्षणाची मागणी नाशिक महापालिकेच्या वतीने केली असल्याने पालकमंत्र्यांच्या बैठकीकडे नाशिककरांच्या नजरा खिळल्या आहेत. त्यामुळे आगामी १५ ऑक्टोबर २०२६ ते ३१ ऑगस्ट २०२७ या कालावधीसाठी धरणांमधून नाशिककरांना पिण्यासाठीचे नवीन आरक्षण महापालिकेने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे नोंदवले आहे.

आठ टीएमसी पाणी आरक्षणाची मागणी

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे शहरात गर्दी वाढणार असल्याने नाशिककरांना पिण्यासाठी ७,३७० दलघफू, तर सिंहस्थ कुंभमेळ्यात येणाऱ्या भाविकांसाठी ६३५ दलघफू, अशा प्रकारे एकूण ८,००५ दशलक्ष घनफूट, अर्थात आठ टीएमसी पाणी आरक्षणाची मागणी महापालिकेने केली आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत नाशिकसाठी किती आरक्षण मंजूर होते, याकडे नाशिककरांच्या नजरा लागल्या आहेत.

अधिक वाचा  राज्यात ऑक्टोबरच्या शेवटी हवामान बदल येथे ‘अवकाळी’ची शक्यता; दुष्काळग्रस्त महाराष्ट्रात आसुसलेल्या आशा पालवल्या

पाणी आरक्षण निश्चित

शहराला पिण्यासाठी गंगापूर, दारणा आणि मुकणे या तीन धरणांतून पाणीपुरवठा केला जातो. त्यातही ७५ टक्के पाणीपुरवठा गंगापूर धरणातून केला जातो. जिल्हा प्रशासन व जलसंपदा विभागामार्फत धरणांमधील उपलब्ध जलसाठ्याचा आढावा घेतला जातो. त्यानंतर पालकमंत्र्यांकडून दर वर्षी १५ ऑक्टोबर ते ३१ जुलै या कालावधीसाठी महापालिका, उद्योग, औष्णिक विद्युत केंद्र एकलहरे यांसह शेतीसाठी पाणी आरक्षण निश्चित केले जाते.

७,३७० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षणाची आवश्यकता

गत १५ ऑक्टोबर २०२५ ते ३१ जुलै २०२६ या काळासाठी नाशिककरांना पिण्यासाठी ६,४०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित करण्यात आले होते. यंदा सिंहस्थ कुंभमेळा असल्याने पाणी आरक्षणाचा कालावधी वाढवून ३१ ऑगस्टपर्यंत करण्यात आला आहे. त्यानुसार १५ ऑक्टोबर २०२६ ते ३१ ऑगस्ट २०२७ या कालावधीकरिता नाशिककरांना पिण्यासाठी गंगापूर धरणातून ५,४४० दलघफू, दारणा धरणातून म्हणजेच चेहेडी बंधाऱ्यातून २३० दलघफू, तर मुकणे धरणातून १,७०० दलघफू, अशा प्रकारे ७,३७० दलघफू पाणी आरक्षणाची आवश्यकता भासणार आहे.

अधिक वाचा  बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना उच्च न्यायालयाचा दिलासा मालमत्ता जप्तीचा आदेशही रद्द; नियमित कायदेशीर व्यवहार म्हणजे ‘किकबॅक’ नव्हे

सिंहस्थासाठी जादा पाणी मागणी

सिंहस्थात यंदा १० ते १२ कोटी भाविक येण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे पाण्याची मागणी अधिक असणार आहे. त्यासाठी गंगापूर धरणातून अतिरिक्त ६५ दलघफू, तर मुकणे धरणातून ५७० दलघफू, अशा प्रकारे एकूण ६३५ दलघफू पाणीआरक्षणाची मागणी स्वतंत्रपणे नोंदविण्यात आली आहे. नाशिककरांना पिण्यासाठी ७,३७० व सिंहस्थासाठी ६३५, अशा प्रकारे एकूण ८,००५ दलघफू पाणी आरक्षणाची मागणी महापालिकेने जिल्हाधिकाऱ्यांकडे नोंदविली आहे.