मुळशी बचाव समन्वयक समितीचे जिल्हाधिकारी यांना निवेदन ; ‘मुळशी’ शब्दाचा गैरवापर रोखणे चित्रीकरणास परवानगी बंधनकारक करा

0

मुळशी तालुका हा संतपरंपरा, वारकरी संप्रदाय, स्वातंत्र्य चळवळ, सत्याग्रह, शिक्षण, शेती, उद्योग, सामाजिक कार्य, क्रीडा आणि सांस्कृतिक परंपरेचा समृद्ध वारसा असलेला तालुका आहे. या भूमीने अनेक कर्तृत्ववान व्यक्ती महाराष्ट्राला दिल्या आहेत. मात्र अलीकडच्या काळात ‘मुळशी पॅटर्न’ किंवा ‘मुळशी’ या शब्दाचा वापर गुन्हेगारी, दहशत, बेकायदेशीर कृत्ये किंवा नकारात्मक घटनांसाठी व्यावसायिक चित्रपटांमध्ये सर्रास केला जात आहे. यामुळे मुळशी तालुक्याची आणि मुळशीकरांची सामाजिक प्रतिमा मोठ्या प्रमाणात मलिन होत आहे. या चुकीच्या प्रतिमेचा गंभीर परिणाम तालुक्यातील युवक, विद्यार्थी, व्यावसायिक तसेच कुटुंबांच्या सामाजिक संबंधांवर होत आहे. मुळशी बचाव समन्वयक समितीमार्फत आज जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी यांना निवेदन देऊन ‘मुळशी’ शब्दाचा गैरवापर रोखणे आगामी चित्रपट चित्रीकरणास परवानगी बंधनकारक करा अशी मागणी यावेळी मागणी करण्यात आली आहे.

अधिक वाचा  ‘भाजपचा सत्ता-संपत्तीचा माज आत्ता बास सुशिक्षित स्वाभिमानी मतदार उतरवणार’; हर्षदा देशमुख-जाधव

याच पार्श्वभूमीवर ‘मुळशी बचाव समन्वय समिती (अराजकीय)’ स्थापन करून मुळशीची खरी ओळख आणि अस्मिता जपण्यासाठी लोकशाही व कायदेशीर मार्गाने प्रयत्न सुरू केले आहेत.

या अनुषंगाने समितीच्या वतीने जिल्हा प्रशासनाकडे खालील मागण्या मांडल्या आहेत.

चित्रपटांच्या नावाला विरोध: आगामी काळात येणाऱ्या कोणत्याही चित्रपटांमध्ये, वेब सिरीजमध्ये अथवा व्यावसायिक कलाकृतींमध्ये ‘मुळशी’ या नावाचा नकारात्मक किंवा गुन्हेगारी पार्श्वभूमी दर्शवण्यासाठी वापर करण्यास आमचा तीव्र विरोध आहे. प्रशासनाने अशा नावांना परवानगी देऊ नये.

चित्रीकरणासाठी समितीची परवानगी बंधनकारक करणे: मुळशी तालुक्याच्या हद्दीमध्ये कोणत्याही चित्रपटाचे, मालिकेचे किंवा व्यावसायिक चित्रीकरण (Shooting) करण्यापूर्वी ‘मुळशी बचाव समन्वय समिती’ची पूर्वपरवानगी व ना-हरकत प्रमाणपत्र (NOC) घेणे बंधनकारक करण्यात यावे, जेणेकरून तालुक्याची संस्कृती आणि प्रतिमेला धक्का पोहोचणार नाही याची खात्री केली जाईल.

अधिक वाचा  बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचा भडका; महाराष्ट्रात ऐन दिवाळीत पाऊस? हवामान विभागाचा मोठा इशारा!

आपण पुणे जिल्ह्याचे मुख्य प्रशासकीय अधिकारी आहात. त्यामुळे या संवेदनशील विषयाची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित विभागांना व चित्रपट निर्मिती संस्थांना योग्य ते आदेश व मार्गदर्शक सूचना जारी कराव्यात, ही मागणी मुळशी बचाव समन्वयक समितीमार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे.