दिग्गज नेत्यांची दिल्ली वारी माजी मंत्री अनिल पाटील तातडीने विमानाने मुंबईला रवाना, राष्ट्रवादीत नेमक्या हालचाली काय?

0

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सुरु असलेल्या घडामोडींनी राज्याचं लक्ष वेधलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार वगळता पक्षाचे इतर दिग्गज नेत्यांनी दिल्लीत जावून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली.या भेटीत नेमकी काय चर्चा झाली? याचा तपशील समजू शकलेला नाही. पण या भेटीगाठीवरुन राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उमेश पाटील यांनी ट्विट करत याबाबत भूमिका मांडली आहे. संबंधित भेट ही नियोजित होती आणि सुनेत्रा पवार यांच्या आदेशानुसारच ही भेट झाल्याचं त्यांचं म्हणणं आहे. असं असलं तरी मुंबईत काही महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री अनिल पाटील हे जळगावहून विमानाने मुंबईच्या दिशेला रवाना झाल्याची माहिती आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील आणि समीर भुजबळ या आठ नेत्यांनी दिल्लीत जावून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे. या भेटीचे फोटो देखील समोर आले आहेत. अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर सर्वजण मुंबईत आले. त्यानंतर मुंबईत या नेत्यांची महत्त्वाची बैठक झाल्याची माहिती आहे.

अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर मुंबईत मलबार हिल येथे छगन भुजबळ यांच्या सातपुडा बंगल्यात सर्व नेते एकत्र जमले. तिथे या नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक पार पडणार असल्याची माहिती आहे. त्याआधी अमित शाह यांची भेट घेऊन आलेल्या नेत्यांची छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी बैठक झाल्याची माहिती आहे.

अधिक वाचा  फळसप ग्रामसुधारणा मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात संपन्न

माजी मंत्री अनिल पाटील मुंबईला रवाना, माध्यमांना काय म्हणाले?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात घडत असलेल्या घडामोडींवर अमळनेरचे आमदार अनिल पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. ते तातडीने मुंबईला रवाना झाले आहेत. त्याआधी त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. “हा केवळ माध्यमांमध्ये बागलबुवा केला जातोय. आमचे काही हितचिंतक आहेत. आमच्यावर प्रेम करणारे इतरपक्षातील काही लोकं आहेत. त्यांच्या मनाप्रमाणे काही गोष्टी पेरल्या जात आहेत. दिल्लीत अमित शाह यांना भेटायला काही वरिष्ठ नेते असतील, त्यांनी सुनेत्रा पवार यांची अनुमती घेतली असेल. त्याशिवाय ते गेलेच नसतील”, अशी प्रतिक्रिया अनिल पाटील यांनी दिली.

संभ्रम निर्माण करण्यासाठी पेरल्या गेलेल्या बातम्या, अनिल पाटील यांचा दावा

“वरिष्ठ नेत्यांनी अमित शाह यांची भेट घेतली म्हणजे प्रत्येकवेळेला राजकीय प्रश्न असतात किंवा मंत्रिमंडळात सहभाग घ्यायचा, असा विषय नसतो. अनेक प्रकारच्या चर्चा होतात. हा केवळ राष्ट्रवादी पक्षात दुफळी आहे, मतमतांतर आहेत, असं मत तयार करण्याचा प्रयत्न आहे. आज माध्यमांमध्ये जो बोललं जात आहे ते केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये संभ्रम निर्माण करण्याच्या दृष्टीकोनाने पेरल्या गेलेल्या बातम्या आहेत”, असा दावा अनिल पाटील यांनी केला.

अधिक वाचा  शासन आदेश ३०४ दुष्काळी तालुक्यांमध्ये जलसंधारणालाच प्राधान्य; प्रत्येक गावात १०० जलशोषक खड्डे, नाले खोलीकरण

“अमित शाह यांच्याबरोबर मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा होत नाही. त्या त्या पक्षाच्या नेतृत्वाकडून त्याबाबत निर्णय घेतला जातो. त्यामुळे याबाबत तिथे चर्चा झाली असेल असं मला वाटत नाही”, असं अनिल पाटील म्हणाले. तसेच अनिल पाटील यांना आपल्याला मंत्रीपद मिळेल का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर त्यांनी “मला मंत्रीपद मिळेल की नाही हे मला माहिती नाही. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वांना एक शब्द दिला होता की प्रादेशिक समतोल राखण्याचा प्रयत्न करू”, असं अनिल पाटील म्हणाले.

अमित शाह यांच्यासोबत चर्चा काय झाली असावी?

“अमित शाह यांच्यासोबत निधी, राज्याच्या स्तरावरील आमदारांच्या तक्रारी असतील, राष्ट्रवादी पक्ष निधीमध्ये कमी पडत आहे. त्याबाबत अमित शाह यांच्यासोबत चर्चा होऊ शकते”, असा अंदाज अनिल पाटील यांनी लगावला.

राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील काय म्हणाले?”केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या आजच्या दिल्लीतील भेटीला अनावश्यक राजकीय रंग देऊन पक्षांतर्गत मतभेदांचे कथानक निर्माण करण्याचा प्रयत्न अत्यंत दुर्दैवी आहे. यापूर्वी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साहेबांची भेट घेऊन स्व. अजितदादांच्या निधनानंतर पक्षासमोरील विविध प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा केली होती.”

अधिक वाचा  भाजपचा 2029 साठी पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरला अमित शाहांची मोठी घोषणा; तुम्ही फक्तं असे कार्य करा अन् जमिनीशी जोडलेले राहा!

“विशेष म्हणजे, त्याच भेटीदरम्यान सुनेत्रावहिनी पवार यांनी स्वतः पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांचे एक शिष्टमंडळ आपली भेट घेणार असल्याची कल्पना शाह साहेबांना दिली होती आणि त्यासाठी वेळ उपलब्ध करून देण्याची विनंतीही केली होती. अजितदादांच्या कार्यकाळातील काही महत्त्वाचे विषय, राज्याच्या हिताचे प्रश्न आणि पक्षाशी संबंधित विविध बाबींची या ज्येष्ठ नेत्यांना सखोल माहिती आहे. त्याच अनुषंगाने आजची ही पूर्वनियोजित, औपचारिक भेट झाली.”

“या भेटीदरम्यान संबंधित नेत्यांनी आपापल्या मतदारसंघांतील विविध प्रश्न मांडले. तसेच महायुतीतील मित्रपक्षांच्या नेत्यांमध्ये स्वाभाविकपणे होणारी अनौपचारिक चर्चा आणि विचारांची देवाणघेवाणही झाली. मात्र, सुनेत्रावहिनी पवार आणि पार्थ पवार यांना डावलून ही भेट झाल्याच्या बातम्या पूर्णतः चुकीच्या, तथ्यहीन आणि दिशाभूल करणाऱ्या आहेत.”

“काही अदृश्य शक्तींकडून अशा बातम्या पेरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत मतभेद आहेत, नेतृत्वामध्ये समन्वय नाही, असे कृत्रिम कथानक निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसते. हा निव्वळ खोडसाळपणा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महायुतीचा महत्त्वाचा घटक असून आमचा पक्ष राष्ट्रीय अध्यक्षा मा. सुनेत्रावहिनी पवार यांच्या खंबीर नेतृत्वाखाली एकसंघ आणि एकदिलाने कार्यरत आहे.

माध्यमांनी बातम्या प्रसिद्ध करताना वस्तुस्थितीची खातरजमा करावी. केवळ तर्कवितर्कांच्या आधारे पक्षांतर्गत संघर्षाचे चित्र रंगविणे योग्य नाही. मित्रपक्षांच्या नेत्यांमधील औपचारिक भेटीचे राजकारण करू नका. पेरलेल्या बातम्या आणि प्रत्यक्ष वस्तुस्थिती यातील फरक समजून घ्या!”