भाजपाचे पदवीधर, शिक्षक मतदार संघासाठी पुण्यावर विशेष लक्ष; कारवाईच्या भीतीने नगरसेवकांचा मतदारांशी संपर्क?

0

विधान परिषदेच्या पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघांच्या प्रचाराची बुधवारी (२१ ऑक्टोबर) सांगता होत असून, पुण्यात मतदार नोंदणी तुलनेने कमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर आता मतदानासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी पुण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.पुण्यात जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी नगरसेवकांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मतदान कमी झाल्यास संबंधित नगरसेवकांना जबाबदार धरण्यात येणार असल्याने कारवाईच्या भीतीने मतदारांशी संपर्क साधण्यासाठी भाजपच्या नगरसेवकांची धावपळ सुरू झाली आहे.

पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघासाठी पुण्यासह कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. पुण्यात तुलनेने मतदारांचे प्रमाण हे कमी आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील नगरसेवकांना जबाबदारी देऊनही त्यांच्याकडून अपेक्षित मतदार नोंदणी झाली नाही. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दखल घ्यावी लागली. त्यांनी संबंधित नगरसेवकांची कानउघाडणी करून भविष्यात पदे देताना ‘रिपोर्ट कार्ड’ पाहण्याचा इशारा दिला आहे. तसेच प्रचारसभेला अनुपस्थित राहणाऱ्या १०० नगरसेवकांना कारणे दाखवा नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे पुण्यावर विशेष लक्ष असणार आहे.

अधिक वाचा  राज्यात आर्थिक चणचणीमुळे दिवाळीचा ‘आनंदाचा शिधा’ नाही; तीव्र दुष्काळ उत्सवात भीष्ण? विरोधकांचे राजकीय ‘तोंडसुख’ही सुरच

पदवीधर मतदार संघात भाजपने डॉ. स्मिता जाधव यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या हर्षदा देशमुख-जाधव आणि शिवसेना (ठाकरे) पक्षाचे सुनील मोदी हे उमेदवार आहेत. शिक्षक मतदार संघात भाजपचे कौस्तुभ गावडे हे उमेदवार आहेत. त्यांच्याविरूद्ध काँग्रेसचे विद्यमान आमदार जयंत आसगावकर, महायुतीतील मित्रपक्ष शिवसेना (शिंदे) पक्षाने अपक्ष उमेदवार सचिन सानप यांना पाठिंबा दिला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सानप यांना पाठिंबा असल्याचे जाहीर केले आहे. याशिवाय या मतदार संघात माजी आमदार दत्तात्रय सावंत हे राष्ट्रीय समाज पक्षाकडून निवडणूक लढवित आहेत.

अधिक वाचा  गोकुळचा ‘अध्यक्ष’निवड नवा ट्विस्ट; …तरच सतेज पाटलांनाच संधी? फक्त ही नोटीस सर्व २५ संचालकांना विहित वेळेत पाठवणे बंधनकारक

भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी पुण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. मतदान जास्त होण्याासाठी प्रत्येक नगरसेवकावर जबाबदारी देण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. मतदान कमी झाल्यास त्याचे भविष्यात परिणाम होण्याच्या शक्यतेने भाजपच्या नगरसेवकांची धावपळ सुरू झाल्याचे दिसून येत आहे.

जास्तीत जास्त मतदानासाठी भाजपची व्यूहरचना

भाजपचे लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी प्रत्येक बुथनुसार २५ जण हे पन्नाप्रमुख म्हणून काम करत असतात. पदवीधर आणि शिक्षक मतदार संघासाठीही पुण्यात भाजपची ही यंत्रणा कार्यरत झाली आहे. त्यांच्याकडून मतदारांशी संपर्क साधण्यावर भर देण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.

अधिक वाचा  मायक्रोसॉफ्टमधून एआयमुळे 60 हजार नोकऱ्यांवर गदा, 1 डिसेंबरचा वेळ दिला एआय टेक्नोलॉजीवर अधिक लक्ष केंद्रीत

१२६ नगरसेवक कामाला?

पदवीधर मतदार संघात तीन लाख ८८ हजार १९ मतदार आहेत. त्यापैकी पुणे जिल्ह्यातील ८८ हजार ७० मतदार हे मतदानाचा हक्क बजाविणार आहेत. शिक्षक मतदार संघात ६२ हजार मतदारांपैकी पुणे जिल्ह्यात १६ हजार ८८२ मतदार आहेत. या मतदारांपैकी जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करण्यासाठी भाजपने नगरसेवकांवर जबाबदारी सोपविली आहे. पुणे महापालिकेत भाजपचे निवडून आलेले ११९ आणि सात स्वीकृत असे १२६ नगरसेवक आहेत. त्यापैकी सुमारे १०० नगरसेवकांनी प्रचारसभेला दांडी मारल्याने त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याबाबतच्या नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. आता मतदानासाठी सर्वच नगरसेवक कामाला लागले असून, मतदारांशी संपर्क साधत आहेत.