महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज, बुधवार (१४ ऑक्टोबर) पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत.नागपूर पदवीधर मतदारसंघातील पक्षांतर्गत नाराजी दूर करण्यासाठी झालेल्या चर्चांनंतर आता मुख्यमंत्री पुणे विभागातील निवडणूक तयारीकडे लक्ष केंद्रित करणार असल्याचे या दौऱ्यावरून स्पष्ट झाले आहे. दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनीही पश्चिम महाराष्ट्रात तळ ठोकला आहे.
पुणे पदवीधर मतदारसंघासाठी डॉ. स्मिता योगेश जाधव, तर पुणे शिक्षक मतदारसंघासाठी कौस्तुभ गावडे हे भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत. या दोन्ही उमेदवारांच्या प्रचारासाठी प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रकांत पाटील, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांनी पुणे शहर, पुणे ग्रामीण, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांतील पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठका घेऊन संघटनात्मक तयारीचा आढावा मंगळवारी घेतला. दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रातील काही विधानसभा मतदारसंघांसाठी भाजपने प्रभारी नियुक्त करून निवडणुकीच्या नियोजनाला गती दिली आहे. मतदार नोंदणी, शिक्षक आणि पदवीधरांशी संपर्क, स्थानिक प्रश्न आणि विधानसभा मतदारसंघनिहाय समन्वय याला भाजपने प्राधान्य दिले आहे.
दरम्यान, या निवडमउकीसाठी भाजपकडून संघटनात्मक तयारीलाही वेग देण्यात आला आहे. प्रदेशाध्यक्ष, आमदार रवींद्र चव्हाण यांनी पश्चिम महाराष्ट्रात ठाण मांडत पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांतील संघटनात्मक आढावा बैठकांद्वारे निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला. मंडल तसेच जिल्हानिहाय बैठका, पदाधिकाऱ्यांशी थेट संवाद आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन यांच्या माध्यमातून त्यांनी निवडणुकीच्या नियोजनाला गती देण्याची सूचना केली आहे.
या बैठकांमध्ये निवडणुकीची रणनीती, मतदारांशी प्रभावी संपर्क, स्थानिक पातळीवरील समन्वय, बूथनिहाय नियोजन आणि पक्षसंघटनेच्या माध्यमातून प्रचार अधिक व्यापक करण्यावर भर देण्यात आला. शिक्षक आणि पदवीधर मतदारांपर्यंत पक्षाची भूमिका तसेच राज्य सरकारच्या विविध उपक्रमांची माहिती पोहोचवण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आल्याची माहिती प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांनी दिली.



