‘नंदनवन’चा नवा आदेश पुणे शिक्षक मतदारसंघ नवा ‘ट्विस्ट’; या संघटनेचा या उमेदवारास पाठिंबा; महायुतीला मोठा फटका

0

पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट समोर आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने (एकनाथ शिंदे गट) या निवडणुकीपासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला होता परंतु आपल्या विचारांशी संलग्न असलेल्या उमेदवारासाठी या निर्णयांमध्ये बदल करून थेट नंदनवन वरून आदेश आणण्यात मंत्री उदय सामंत यशस्वी ठरल्याने रंगत वाढली आहे. सर्वाधिक नोंदणी असलेल्या या संघटनेच्या या निर्णयाचा फायदा अपक्ष उमेदवार डॉ. बी. पी. रोंगे, बंडखोर सानप यांना मिळणार की राष्ट्रवादीचे माजी आमदार दत्तात्रय सावंत यांना होणार, याची जोरदार चर्चा सुरू आहे.

पुणे शिक्षक मतदारसंघात शिंदे यांचे निकटवर्तीय मंगेश चिवटे हे इच्छुक होते. त्यांनी उमेदवारी अर्ज दाखलही केला होता. परंतु, ऐनवेळी भाजपने कौस्तुभ गावडे यांना उमेदवारी दिल्याने पेच निर्माण झाला. अखेर मंगेश चिवटे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यावरून शिंदेसेना नाराज असल्याची चर्चा आहे. त्यातच आता एकनाथ शिंदे सेनेने या निवडणुकीपासून अलिप्त राहण्याची भूमिका घेतली आहे. पुणे शिक्षक मतदारसंघात शिंदे सेनेचे सुमारे दहा हजार शिक्षक मतदार असल्याचा दावा पदाधिकाऱ्यांकडून केला जात आहे. त्यामुळे एकनाथ शिक्षक सेना कोणाला पाठिंबा देणार, याविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

अधिक वाचा  ‘भाजपचा सत्ता-संपत्तीचा माज आत्ता बास सुशिक्षित स्वाभिमानी मतदार उतरवणार’; हर्षदा देशमुख-जाधव

पंढरपूरच्या स्वेरीचे संस्थापक डॉ. बी. पी. रोंगे यांनी या निवडणुकीसाठी सुरुवातीपासूनच जोरदार तयारी सुरू केली आहे. मागील दोन वर्षांपासून ‘शाळा टू शाळा व शिक्षक टू शिक्षक’ असा संवाद साधून त्यांनी संपर्क वाढवला आहे. रोंगे यांनी भाजपकडे उमेदवारीची मागणी केली होती, परंतु भाजपने गावडे यांना उमेदवारी दिली. दुसरीकडे माजी आमदार दत्तात्रय सावंत यांनी यावेळी रासपकडून उमेदवारी अर्ज दाखल करून नवा राजकीय डाव टाकला आहे. सावंत यांची ही राजकीय खेळी किती यशस्वी होते, हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे.

महाविकास आघाडीचे उमेदवार तथा विद्यमान आमदार जयंत आसगावकर यांनीही मोर्चेबांधणी केली आहे. परंतु, भाजपने काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्या भाची डॉ. स्मिता जाधव यांना पदवीधरची उमेदवारी देऊन आसगावकर यांच्यासमोर राजकीय गतिरोधक निर्माण केला आहे.

अधिक वाचा  पुणे विधानपरिषद आमचे दोन्हीही उमेदवार उच्चशिक्षित मोठ्या फरकाने विजयी होणार; गोकुळवरून चंद्रकांत पाटलांनी ट्रोलर्संनाही सुनावलं

स्मिता जाधव यांच्या उमेदवारीमुळे आसगावकरांसमोरच्या अडचणी वाढल्या आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडीने हर्षदा देशमुख यांना उमेदवारी देऊन जाधव यांच्यासमोर आव्हान उभे केले आहे. हर्षदा देशमुख यांचा सोलापूर, पुणे, सातारा या भागात चांगला जनसंपर्क असून त्याचा त्यांना फायदा होण्याची शक्यता आहे. दोन्ही मतदारसंघांमध्ये जोरदार रस्सीखेच असून यामध्ये कोण बाजी मारणार, याकडेच आता शिक्षक व पदवीधरांचे लक्ष लागले आहे.