कोथरूड डेपो भागातील शांतीबन चौक ते डावी भुसारी कॉलनी (हायवे सर्विस रोड पर्यंत) जाणारा डीपी रोड ची रुंदी 15 मीटरवरून 36 मीटर करण्याबाबत सकारात्मक हालचाली सुरू झाल्या असून दैनंदिन वाहतूक कोंडी चा सामना करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांसाठी ही दिलासाची बातमी आहे. रस्ता वाहतुकीसाठी खुला झाल्यापासून या ठिकाणी स्थानिक नागरिकांना आणि वाहन चालकांना रोजच प्रचंड वाहतूक कोंडीच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. सद्य स्थितीत केवळ १५ मीटर(पूर्ण ताब्यात नसलेला) रुंदीचा रस्त्यामुळे स्थानिकांना होणाऱ्या अडचणीची माहिती स्थानिक नगरसेविका कल्पनाताई वर्पे यांनी पुणे महापालिका आयुक्त यांना दिली होती. त्यानंतर तातडीने संबंधित विषयाबाबत पुणे महापालिका प्रशासनामध्ये युद्ध पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत.
पुणे महापालिका पथविभाग उपायुक्त सुनील बनकर यांनी संबंधित पत्राची दखल घेत तात्काळ मा. कार्यकारी अभियंता बांधकाम विकास विभाग (झोन क्र.३) शांतीबन चौक ते डावी भुसारी कॉलनी येथील डीपी रस्ता (हायवे सर्व्हिस रोड पर्यंत) रुंदीकरण (३६ मी.) करणेबाबत सद्यस्थिती अहवाल देण्याच्या सूचना केल्या आहेत. सौ. अल्पना गणेश वरपे, अध्यक्षा महिला व बालकल्याण समिती, सभासद, पुणे महापालिका यांच्या सूचनेनुसार भविष्यातील वाहतुकीचे नियोजन आणि नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी शांतीबन चौक गणेश मंदिर ते डावी भुसारी कॉलनी येथील हायवे सर्व्हिस रस्त्या पर्यंतचा हा संपूर्ण डीपी रस्ता ३६ मीटरचा करण्यात यावा, असे कळविले आहे.
आगामी प्रकल्पांमुळे निर्माण वाहतुकीच्या समस्या:-
मेट्रो प्रकल्प व उड्डाणपूलः- आगामी काळात पौड रस्त्यावरील ‘वनाझ ते चांदणी चौक’ मेट्रो स्टेशन आणि उड्डाणपुलाचे काम सुरू होणार आहे. या मोठ्या विकासकामांच्या काळात मुख्य रस्त्यावरील वाहतूक मोठ्या प्रमाणावर वळवली जाईल, ज्याचा थेट आणि प्रचंड ताण या १५ मीटरच्या डीपी रस्त्यावर येणार आहे.
भविष्यातील गरजः- सद्यस्थितीतील वाहतूक कोंडी आणि भविष्यातील मेट्रो व उड्डाणपुलाच्या कामाची व्याप्ती व सदर परिसरातील लोकसंख्या लक्षात घेता, हा रस्ता १५ मीटर असणे कोणत्याही दृष्टीने पुरेसे नाही.
पुणे महापालिकेच्या वतीने या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी स्थायी विभाग व पतविभाग आणि पुणे महापालिका आयुक्त कार्यालय यांच्या वतीने सार्वत्रिक प्रयत्न केले जात असल्याने आगामी काळात या भागातील वाहतूक कोंडी सोडण्यास मदत होण्याची शक्यता आहे.



