सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पार पडलेल्या सहा जागांच्यासाठीची मतमोजणी पार पडली. या निवडणुकीच्या निमित्ताने भाजपा आमदार गोपीचंद पडळकर, माजी खासदार संजयकाका पाटील, माजी आमदार सुमनताई पाटील आणि माजी मंत्री अजितराव घोरपडे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.सहा जागांसाठी अत्यंत चुरशीने मतदान झालं होतं. मतमोजणीत मोठा उलटफेर झाला आहे. तासगाव गटात माजी खासदार संजयकाका पाटील यांनी माजी आमदार सुमन आर आर पाटील यांचा अवघ्या एका मताने पराभव केला. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पाटील यांना हा धक्का आहे.
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (DCC Bank) निवडणुकांमध्ये तासगाव सोसायटी गटात अत्यंत थरारक आणि श्वास रोखून धरायला लावणारी लढत पाहायला मिळाली. या महासंग्रामात अखेर माजी खासदार संजयकाका पाटील यांनी अवघ्या १ मताने दणदणीत विजय मिळवला आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या माजी आमदार सुमनताई पाटील यांचा पराभव केला. या अटीतटीच्या निवडणुकीत संजयकाका पाटील यांना ३९ मते मिळाली, तर सुमनताई पाटील यांना ३८ मतांवर समाधान मानावे लागले. अवघ्या १ मताने झालेल्या या पराभवामुळे तासगावचे आमदार रोहित पाटील यांच्यासाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.
गोपीचंद पडळकरांचे काय झालं?
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (DCC Bank) मतमोजणीत भाजपचे फायरब्रँड आमदार गोपीचंद पडळकर यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या जत सोसायटी गटातून गोपीचंद पडळकर यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार विनोद पवार यांचा २० मतांनी पराभव केला.या हायव्होल्टेज लढतीत गोपीचंद पडळकर यांना ५४ मते मिळाली, तर महाविकास आघाडीच्या विनोद पवार यांना अवघ्या ३४ मतांवर समाधान मानावे लागले. या विजयामुळे आमदार पडळकर यांनी सांगली जिल्हा बँकेच्या राजकारणात दणदणीत एन्ट्री केली आहे.
निकालाची अधिकृत घोषणा होताच मतमोजणी केंद्राबाहेर संजयकाका पाटील आणि गोपीचंद पडळकर समर्थकांनी गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी आणि जोरदार घोषणाबाजी करत एकच जल्लोष केला.
सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय बाजूला ठेवत त्यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरवला. त्यामुळे त्यांना निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला होता. या न्यायालयीन लढाईमुळे पडळकर यांच्या निवडणुकीची राज्यभर चर्चा झाली होती. अखेर न्यायालयीन लढाईनंतर निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या पडळकर यांनी २० मतांनी विजय मिळवला आहे. त्यामुळे आता त्यांच्या विजयाची जोरदार चर्चा सुरू आहे.
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत बहुतांश जागा बिनविरोध झाल्याने सत्तेचे चित्र स्पष्ट झाले आहे. मात्र, जत सोसायटी गटातील निवडणूक चांगलीच लक्षवेधी ठरली होती. या गटातून भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर निवडणूक रिंगणात उतरल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील आणि पडळकर यांच्यातील राजकीय संघर्ष पुन्हा एकदा चर्चेत आला होता. पडळकर यांना जिल्हा बँकेत प्रवेश मिळू नये, यासाठी जयंत पाटील यांनी आखलेली रणनीती यशस्वी ठरणार की पडळकर ही खेळी मोडून काढणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. मात्र, आता अखेर पडळकर यांनी तब्बल २० मतांनी जिल्हा बँकेत प्रवेश केला आहे.



