बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. आज (ता. ३) राज्यातील २० जिल्ह्यांत विजांसह पावसाची शक्यता असून, सात जिल्ह्यांना वादळी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.सिंधुदुर्ग, कोल्हापूर, लातूर, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘मुरासू’ चक्रीवादळामुळे राज्यात पावसासाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे. उर्वरित राज्यात अंशतः ढगाळ हवामान राहून तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे.पावसाळी वातावरणामुळे राज्यातील कमाल तापमानात घट झाली आहे. सोमवारी (ता. २) सकाळपर्यंतच्या २४ तासांत रत्नागिरी येथे राज्यातील उच्चांकी ३६.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. डहाणू येथे ३४.३, अमरावती येथे ३४.६, तर अकोला येथे ३४ अंश सेल्सिअस तापमान होते. गोंदिया येथे राज्यातील नीचांकी १७.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
दरम्यान, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या. पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथे १३० मिलिमीटर, तर बारामती येथे ८० मिलिमीटर पाऊस झाला. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली. पुणे शहरात ४०, पुरंदर येथे ३०, चिंचवड येथे २० मिलिमीटर पाऊस झाला. सातारा, कोल्हापूर, वेल्हे, वडगाव मावळ, दौंड, शिरूर, घोडनदी आणि महाबळेश्वर येथे प्रत्येकी १० मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
वादळी पावसाचा येलो अलर्ट : सिंधुदुर्ग, कोल्हापूर, लातूर, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली.
विजांसह पावसाची शक्यता : रत्नागिरी, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, परभणी आणि हिंगोली.



