महाबोधी महाविहार मुक्तीसाठी सत्ताधाऱ्यांना सत्तेवरून पायउतार करण्याची ताकद निर्माण करा – विजय तांबे

0

बदलापूर : (रामदास धो. गमरे) “महाबोधी महाविहार ही आमची विरासत आहे, मात्र तिच्यावर बीटीएमसीच्या काळ्या कायद्याद्वारे मनुवाद्यांनी ताबा मिळवला आहे. आमचा बुद्ध आम्हाला त्यांच्या तावडीतून सोडवायचा असेल, तर ज्या बिहार सरकारने हा कायदा केला, त्या प्रस्थापित सरकारला सत्तेवरून पायउतार करण्याची ताकद निर्माण करावी लागेल,” असे प्रतिपादन वर्षावास मालिकेचे पंधरावे पुष्प गुंफत असताना “महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन – सद्यस्थिती आणि आमचे योगदान” या विषयावर बोलत असताना बौद्धजन पंचायत समितीचे विश्वस्त गटप्रतिनिधी तथा महाबोधी महाविहार बोधगया मुक्ती आंदोलन राष्ट्रीय समितीचे कार्यकारिणी सदस्य विजय विश्राम तांबे यांनी केले.

बौद्धजन पंचायत समिती संलग्न संस्कार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सालाबादप्रमाणे याही वर्षी आषाढ पौर्णिमा ते आश्विन पौर्णिमा या कालावधीत वर्षावास धम्म प्रवचन मालिकेचे आयोजन करण्यात आले असून सदर मालिकेचे पंधरावे पुष्प दि. २४ ऑक्टोबर २०२६ रोजी उपसभापती विनोद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह, भोईवाडा, परेल, मुंबई – १२ येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले.

अधिक वाचा  शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी 5 हजारांची अग्रिम मदत! कोणाला पैसे, कोण वंचित निकष काय? सविस्तर वाचा

आपल्या भाषणात पुढे बोलत असताना विजय तांबे यांनी “१३५ वर्षांपासून सुरू असलेल्या या लढ्याचा इतिहास उलगडला. अनागारिक धम्मपाल यांनी सुरू केलेले आंदोलन, भंते नागार्जुन सुरई ससाई यांचे योगदान आणि सध्या डॉ. आकाश लामा यांच्या नेतृत्वाखाली बोधगया येथे गेली ६७० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेल्या आंदोलनाची सविस्तर माहिती देत तमाम बहुजन समाजाने एकत्र येऊन हे आंदोलन तन-मन-धनाने बळकट करावे” असे आवाहन केले.

अध्यक्षीय भाषणात बोलत असताना “बौद्धजन पंचायत समिती नेहमीच या मुक्ती आंदोलनात सक्रिय सहभागी आहे. या आंदोलनाला पाठिंबा म्हणून मुंबईत दोन भव्य मोर्चे काढण्यात आले आहेत आणि यापुढेही हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी सहकार्य करू.” असे कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा बौद्धजन पंचायत समितीचे उपसभापती विनोद मोरे यांनी नमूद केले.

अधिक वाचा  पुणेकरांनो, उन्हाचा चटका आणखी वाढणार! मंगळवारपासून कमाल तापमान ३६ अंशांवर जाण्याचा अंदाज

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरचिटणीस राजेश घाडगे यांनी आपल्या भारदस्त आणि पहाडी आवाजात लाघवी भाषाशैलीत केले तसेच संस्कार समितीचे सचिव मनोहर बापू मोरे आणि उपस्थित बौद्धाचार्यांनी सुमधुर वाणीने सूत्तपठण करून कार्यक्रमाची सुरुवात केली. सदर प्रसंगी विचारमंचावर बौद्धजन पंचायत समितीचे कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत, उपकार्याध्यक्ष मनोहर मोरे, चंद्रमणी तांबे, पांडुरंग साळवी, आयु. तुकाराम घाडगे, विवाह मंडळाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार राजाभाऊ तथा रामदास धो. गमरे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सरतेशेवटी सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या सर्वांचे तसेच संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन करणारे संस्कार समितीचे अध्यक्ष मंगेश पवार आणि सर्व उपस्थितांचे संस्कार समितीचे सचिव मनोहर बापू मोरे यांनी आभार व्यक्त करून सरणेत्तेय सुत्त घेऊन कार्यक्रमाची सांगता केली.

अधिक वाचा  सामायिक सातबाराबाबतच्या परिपत्रकामुळे शहरी भागात गंभीर समस्या निर्माण अडचणीवर उपाय शोधा: उज्वल केसकरांची मागणी