टोल नाक्यापासून २० किमी परिसरात राहणाऱ्यांना मोठा दिलासा! हजारो रूपये वाचणार; १ नोव्हेंबरपासून नवा नियम लागू

0

राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्यापासून 20 किलोमीटरच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकारने स्थानिक खासगी वाहनधारकांसाठी सवलतीच्या दरात फास्टॅग वार्षिक पास उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (MoRTH) यासंदर्भात अधिसूचना जारी केली असून, १ नोव्हेंबर २०२६ पासून ही सुविधा लागू होणार आहे. नव्या नियमानुसार पात्र वाहनधारकांना वर्षभरासाठी १,५०० किंवा ३००० रुपयांत वार्षिक पास घेता येणार आहे.

राष्ट्रीय महामार्ग शुल्क (दर निश्चिती आणि वसुली) नियमांमधील पाचव्या सुधारणेंतर्गत ही सुविधा सुरू करण्यात येत आहे. टोल नाक्याजवळ राहणाऱ्या नागरिकांना वारंवार टोल भरण्याचा आर्थिक भार कमी करणे, हा या निर्णयामागील उद्देश आहे.

अधिक वाचा  पुणे विधानपरिषद आमचे दोन्हीही उमेदवार उच्चशिक्षित मोठ्या फरकाने विजयी होणार; गोकुळवरून चंद्रकांत पाटलांनी ट्रोलर्संनाही सुनावलं

वार्षिक पाससाठी किती शुल्क भरावे लागणार?

नव्या नियमानुसार, टोल नाक्याच्या स्थानानुसार वार्षिक पासचे शुल्क निश्चित करण्यात आले आहे.

  • नगरपालिका किंवा स्थानिक शहराच्या हद्दीबाहेरील टोल नाक्यांसाठी- १,५०० रुपये
  • नगरपालिका किंवा स्थानिक शहराच्या हद्दीतील टोल नाक्यांसाठी- ३,००० रुपये

सध्या स्थानिक वाहनधारकांना मासिक पाससाठी सुमारे ३६० रुपये मोजावे लागतात. या हिशोबाने वर्षभरात ४,३२० रुपये खर्च होतात. नव्या वार्षिक पासमुळे पात्र वाहनधारकांना वर्षाला १,३२० ते २,८२० रुपयांपर्यंत बचत होऊ शकते.

कोणाला मिळणार या पासचा लाभ?

हा वार्षिक पास केवळ वैयक्तिक वापरासाठी नोंदणी केलेल्या बिगरव्यावसायिक खासगी वाहनांसाठी उपलब्ध असेल. संबंधित वाहनावर वैध आणि कार्यरत FASTag असणे आवश्यक आहे. तसेच, हा पास ज्या टोल प्लाझासाठी जारी केला जाईल, त्याच टोल प्लाझावर वापरता येईल. इतर टोल नाक्यांवर या पासचा वापर करता येणार नाही.

अधिक वाचा  अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीत ९१.०८ टक्के मतदान; शांततेत निर्भय वातावरणात मतदान प्रक्रिया पार

या अटींची पूर्तता आवश्यक

या सुविधेचा लाभ घेण्यासाठी काही महत्त्वाच्या अटी लागू करण्यात आल्या आहेत. टोल नाक्यापासून २० किलोमीटरच्या परिसरात वास्तव्य असण्यासोबतच वाहनधारकाने निर्धारित पात्रता पूर्ण करणे आवश्यक आहे.

तसेच, संबंधित ठिकाणी सर्व्हिस रोड किंवा पर्यायी मार्ग उपलब्ध असल्यास या पासचा लाभ मिळणार नाही. बंदिस्त वापरकर्ता शुल्क वसुली प्रणाली अंतर्गत टोल आकारल्या जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गांवर आणि द्रुतगती मार्गांवरही ही सुविधा लागू होणार नाही.