अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीत ९१.०८ टक्के मतदान; शांततेत निर्भय वातावरणात मतदान प्रक्रिया पार

0

विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांतील ८१ मतदान केंद्रांवर शांततेत व निर्भय वातावरणात मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी जवळपास ९१.०८ टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त नयना गुंडे यांनी दिली. आज सकाळी ८ वाजता सर्व मतदान केंद्रावर शांततेत मतदानास सुरूवात झाली. मतदानासाठी विभागातील पाच जिल्ह्यांत ८१ मतदान केंद्र स्थापन करण्यात आली होती. सकाळी ८ ते दुपारी ४ पर्यंत मतदानासाठी वेळ देण्यात आली होती. अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी एकुण मतदारांची संख्या ३५ हजार ८१० असून त्यापैकी ३२ हजार ६१६ मतदारांनी मतदान केले आहे.

अधिक वाचा  शिक्षक मतदारसंघातील मतदानादरम्यान उमेदवार ढसाढसा रडला, सर्व व्यवस्थेवरचा विश्वास उडालाय, मी इस्लाम स्वीकारणार

जिल्हानिहाय एकुण मतदानाची माहिती अशी-

  • अमरावती – १०,०९७ पैकी ९०२३ (८९.३६ टक्के),
  • अकोला – ५,९४२ पैकी ५४७४ (९२.१२ टक्के),
  • बुलढाणा – ९,१२४ पैकी ८२८० (९०.७५ टक्के),
  • वाशिम – ३,७१५ पैकी ३४५० (९२.८७ टक्के)
  • यवतमाळ – ६,९३२ पैकी ६३८९ (९२.१७ टक्के)

मतदारांनी म्हणजे एकूण जवळपास ९१.०८ टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असल्याची प्राथमिक अंदाजे आकडेवारी पुढे आली आहे. मतदान केंद्रावरील कामकाजाची माहिती घेऊन विभागीय आयुक्तांनी विभागातील जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना केले.

अमरावती विभागातील मतदान केंद्रावरील मतदान प्रक्रियेवर वेब कास्टींगच्या माध्यमातून विभागीय आयुक्त आणि निवडणूक निरीक्षक मतदान प्रक्रिया संपेपर्यंत लक्ष ठेवून होते. याचप्रमाणे त्या त्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी हे सुद्धा जिल्ह्यातील मतदान प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवून होते. रात्री उशिरापर्यंत मतपेट्या स्टॉंगरूम येथे सुरक्षितरित्या जमा केल्या जातील अशी अपेक्षा आहे. या निवडणुकीची मंगळवार २७ ऑक्टोबर २०२६ रोजी अमरावती येथील लोकशाही भवन येथे मतमोजणीची प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे.

अधिक वाचा  विधान परिषदेच्या 5 जागांसाठी आज मतमोजणी शिक्षक- पदवीधरांचा आमदार कोण? कुणाचा गुलाल उधळणार?