नागपूर पदवीधर ६४.७६ टक्के मतदान वर्धा, गडचिरोलीत सर्वाधिक प्रतिसाद; नागपूरमध्ये निरुत्साहच टक्केवारीही घटली

0

नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी पार पडलेल्या मतदानाने ‘फर्स्ट क्लास’ गाठला. रात्री उशिरा हाती आलेल्या आकडेवारीनुसार संपूर्ण मतदारसंघात ६४.७६ टक्के मतदान झाले. विभागातील सहाही जिल्ह्यांतील एकूण २ लाख ५५ हजार ६०३ मतदारांपैकी १ लाख ६५ हजार ५४१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांत मतदानाचा टक्का सर्वाधिक राहिला, तर नागपूर जिल्ह्यात सर्वांत कमी मतदान झाले. मागील निवडणुकीत नोंदविण्यात आलेल्या ६४.३८ टक्के मतदानाच्या तुलनेत यंदा मतदानात ०.३८ टक्क्यांची किंचित वाढ झाली आहे.

या निवडणुकीत महायुतीचे सुधाकर कोहळे आणि महाविकास आघाडीचे अभिजीत वंजारी यांच्यात प्रमुख लढत झाली. एकूण ३८ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. त्यामुळे मतदानाचा टक्का आणि मतदारांचा सहभाग याकडे राजकीय पक्षांचे लक्ष लागले होते. नागपूर विभागातील नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली या सहाही जिल्ह्यांत शुक्रवारी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान झाले. सकाळी मतदान केंद्रांवर मतदारांची चांगलीच उपस्थिती दिसून आली. विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी बूथपातळीवर यंत्रणा सक्रिय ठेवत मतदारांना मतदान केंद्रांची माहिती देणे आणि मतदानासाठी प्रोत्साहित करण्यावर भर दिला.

अधिक वाचा  अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीत ९१.०८ टक्के मतदान; शांततेत निर्भय वातावरणात मतदान प्रक्रिया पार

गडचिरोली, चंद्रपुरात सर्वाधिक मतदान जिल्हानिहाय आकडेवारीत गडचिरोली जिल्ह्यात ७२.९५ टक्के मतदान झाले. चंद्रपूर जिल्ह्यात ७२.५९ टक्के, गोंदिया जिल्ह्यात ७१.५३ टक्के, वर्धा जिल्ह्यात ६८.३७ टक्के, भंडारा जिल्ह्यात ६७.०७ टक्के, तर नागपूर जिल्ह्यात सर्वात कमी ६०.३३ टक्के मतदानाची नोंद झाली. नागपूर जिल्ह्यात विभागातील सर्वाधिक १ लाख ४४ हजार ४६६ मतदार होते. त्यापैकी ८७ हजार १५० मतदारांनी मतदान केले. मात्र, टक्केवारीच्या बाबतीत नागपूर जिल्हा अन्य जिल्ह्यांच्या मागे राहिला.

पुरुष मतदारांचा सहभाग अधिक विभागात पुरुष मतदारांनी महिलांच्या तुलनेत अधिक मतदान केले. एकूण १ लाख ४७ हजार २८० पुरुष मतदारांपैकी १ लाख १ हजार ५०३ जणांनी मतदान केले. पुरुषांच्या मतदानाची टक्केवारी ६८.९२ आहे. महिला मतदारांमध्ये १ लाख ८ हजार ३०१ मतदारांपैकी ६४ हजार ३८ जणींनी मतदान केले. महिलांच्या मतदानाची टक्केवारी ५९.१३ इतकी राहिली. इतर प्रवर्गातील २२ मतदारांपैकी एकाही मतदाराने मतदान केल्याची नोंद नाही.मागील निवडणुकीच्या तुलनेत मतदान वाढले मागील निवडणुकीत नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघात ६४.३८ टक्के मतदान झाले होते. यंदा मतदान ६४.७६ टक्क्यांवर पोहोचल्याने मतदानात ०.३८ टक्क्यांची किंचित वाढ झाली. पदवीधर मतदारसंघात मतदारांना मतदानासाठी बाहेर काढण्याचे आव्हान राजकीय पक्षांसमोर असते. यंदाही बूथपातळीवर प्रयत्न झाले असून, मागील निवडणुकीतील मतदानाची टक्केवारी यंदा ओलांडण्यात आली.

अधिक वाचा  गोकुळचा ‘अध्यक्ष’निवड नवा ट्विस्ट; …तरच सतेज पाटलांनाच संधी? फक्त ही नोटीस सर्व २५ संचालकांना विहित वेळेत पाठवणे बंधनकारक

जिल्हानिहाय अंतिम मतदान : मतदान टक्केवारी

  1. नागपूर : ६०.३३
  2. भंडारा : ६७.०७
  3. गोंदिया : ७१.५३
  4. वर्धा : ६८.३७
  5. चंद्रपूर : ७२.५९
  6. गडचिरोली : ७२.९५

पहिल्या फेरीचा कोटा किती? – जर मतदानाची ही आकडेवारी अंतिम पकडली, तर मतमोजणीदरम्यान पहिल्या फेरीचा कोटा हा एकूण वैध मतदानाच्या निम्मी संख्या अधिक एक या सूत्रानुसार ८२,७७२ राहू शकतो. जर सर्व मते वैध राहिली तर पहिल्या फेरीतील कोटा इतका असेल. काही मते अवैध आढळल्यास या आकडेवारीत बदल होईल व वैध मतांच्या निम्म्याहून एक मत अधिक इतका कोटा असेल.