आर.एम.सी. प्लांट्सवरील कारवाई ही नागरी एकजुटीचाच विजय! प्लांट्स पुन्हा सुरू झाल्यास तीव्र विरोध करणार: दिलीप वेडेपाटील

0

पुणे : पुणे शहरातील निवासी भागांमध्ये सुरू असलेल्या अनधिकृत आर.एम.सी. (रेडी मिक्स काँक्रीट) प्लांट्समुळे होणारे धूळ व ध्वनी प्रदूषण, परिसरातील अस्वच्छता तसेच नागरिकांच्या आरोग्याला निर्माण होणारा धोका या गंभीर समस्यांच्या पार्श्वभूमीवर, हे प्लांट्स पुणे शहरातून हद्दपार करून शहराबाहेर हलविण्याची ठाम मागणी नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांनी पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीकडे केली होती.

आर.एम.सी. प्लांट्समधून निर्माण होणाऱ्या धुळीमुळे परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत असून, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि श्वसनाशी संबंधित त्रास होण्याची शक्यता असलेल्या व्यक्तींना विशेषतः याचा फटका बसू शकतो. तसेच, प्लांट्समधील अवजड वाहनांची वाहतूक आणि कामकाजामुळे परिसरातील रहिवाशांच्या दैनंदिन जीवनावरही परिणाम होत आहे. त्यामुळे नागरिकांना प्रदूषणमुक्त आणि आरोग्यदायी वातावरण मिळणे आवश्यक आहे.

अधिक वाचा  बाल्कनीतील कपड्यांवर निर्बंध घालण्यापूर्वी पुणे महापालिकेने कचरा व्यवस्थापनातील त्रुटी दूर कराव्यात: पतित पावन संघटनेची मागणी

या समस्येची गांभीर्याने दखल घेत नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांनी आर.एम.सी. प्लांट्सच्या प्रश्नावर सातत्याने पाठपुरावा केला. या लढ्याला स्थानिक नागरिकांनीही भक्कम साथ दिली. नागरिकांच्या आरोग्याचा आणि पर्यावरणाच्या संरक्षणाचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवून केलेल्या या प्रयत्नांना आता सकारात्मक यश मिळू लागले आहे. पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत अनधिकृत आर.एम.सी. प्लांट्सवर मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली आहे.

ही कारवाई म्हणजे नागरिकांच्या एकजुटीचा, जनहितासाठी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचा आणि प्रदूषणमुक्त परिसरासाठी उभारलेल्या लढ्याचा विजय आहे, अशी भावना नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांनी व्यक्त केली.

मात्र, या कारवाईनंतर संबंधित अनधिकृत प्लांट्स पुन्हा सुरू करण्याचा किंवा पुन्हा उभारण्याचा प्रयत्न झाल्यास तो कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही, असा ठाम इशाराही त्यांनी दिला आहे.

अधिक वाचा  महामानव विचार मंच संस्थेच्या वतीने ७० वा धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात संपन्न

यासंदर्भात बोलताना नगरसेवक दिलीप वेडेपाटील म्हणाले, “पुणेकरांना स्वच्छ हवा, निरोगी वातावरण आणि प्रदूषणमुक्त परिसरात राहण्याचा अधिकार आहे. नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड करून कोणालाही अनधिकृत व्यवसाय करता येणार नाही. आर.एम.सी. प्लांट्सवरील कारवाई ही नागरिकांच्या एकजुटीची ताकद आहे. हे प्लांट्स पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न झाल्यास आम्ही नागरिकांच्या साथीने त्याला तीव्र विरोध करू. गरज पडल्यास प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन विरोध नोंदवू आणि संबंधित प्रशासनाकडे पुन्हा कठोर कारवाईची मागणी करू. अनधिकृत प्लांट्सना पुन्हा उभे राहू देणार नाही, ही आमची ठाम भूमिका आहे.”

तसेच, पुणे महानगरपालिका प्रशासनाने या कारवाईपुरते मर्यादित न राहता संबंधित प्लांट्सच्या परवानग्या, आवश्यक ना-हरकत प्रमाणपत्रे आणि पर्यावरणविषयक नियमांची पूर्तता यांची तपासणी करावी. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्लांट्सवर नियमानुसार कठोर कारवाई करावी आणि कारवाईनंतर असे प्लांट्स पुन्हा सुरू होणार नाहीत, यासाठी नियमित देखरेख ठेवावी, अशी मागणीही त्यांनी केली.

अधिक वाचा  पुणेकरांवर पाणी कपातीचं संकट, पुढील आठ महिन्यासाठी पालिकेचे आज कठोर निर्बंध,’या लोकांना पाणी वापरता येणार नाही…

नागरिकांचे आरोग्य, पर्यावरणाचे संरक्षण आणि पुणे शहराचा शाश्वत विकास यासाठी हा लढा यापुढेही सुरूच राहील. नागरिकांनीही अशा अनधिकृत प्लांट्सबाबतची माहिती प्रशासनाच्या निदर्शनास आणून देऊन या मोहिमेला सहकार्य करावे, असे आवाहन नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांनी केले.

“नागरिकांची साथ हीच आमची ताकद आणि जनहित हाच आमचा संकल्प!” असल्याचे दिलीप वेडेपाटील नगरसेवक, पुणे महापालिका यांनी सांगितले आहे.