महामानव विचार मंच संस्थेच्या वतीने ७० वा धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात संपन्न

0

पनवेल : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन सामाजिक, धार्मिक व शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या महामानव विचार मंच संस्थेच्या वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी संस्थेचे अध्यक्ष सुरेश शिरसाठ यांच्या अध्यक्षतेखाली महामानव विचार मंच स्मारक, देवद, नवीन पनवेल येथे सम्राट अशोक विजयादशमी, दसरा आणि ७० वा धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

सदर प्रसंगी कार्यक्रमाच्या प्रथम सत्रात संस्थेचे अध्यक्ष सुरेश शिरसाठ, जेष्ठ सल्लागार भगवान यादव आणि जेष्ठ सभासदा शशिकला यादव यांच्या शुभहस्ते तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून ज्योत प्रज्वलित करून कार्यक्रमची सुरवात करण्यात आली. तद्नंतर बौद्धाचार्य सुरेंद्र साखरे यांनी सुमधुर वाणीने त्रिशरण, पंचशील व बुद्धवंदना घेतली तर बौद्धाचार्य सुरेश शिरसाठ यांनी आशीर्वाद गाथा पठण करून उपस्थितांना आशीर्वाद दिले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक सादर करीत असताना कार्याध्यक्ष प्रवीण रा. रसाळ यांनी संस्थेची आजवरची जडणघडण, सम्राट अशोक विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन याचे महत्व विषद केले सोबतच शशिकला यादव, आयुष यादव, विघ्नेश यादव, रुही मोरे, सुजाता खैरे, कविता काळे आदींनी आपले विचार व्यक्त केले.

अधिक वाचा  पुणे पदवीधरमध्ये सोलापूर, शिक्षकमध्ये सातारा आघाडीवर शिक्षक मतदारसंघ ८५.८७ तर पदवीधर ६२.७८ टक्के मतदान

अध्यक्षीय भाषणात बोलत असताना सुरेश शिरसाठ यांनी “१४ ऑक्टोबर १९५६ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथील दीक्षाभूमीवर लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन भारतीय सामाजिक इतिहासात एका नव्या परिवर्तनाची मुहूर्तमेढ रोवली; या ऐतिहासिक घटनेच्या स्मृतिप्रीत्यर्थ साजऱ्या होणाऱ्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून महामानव विचार मंचाच्या वतीने समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय आणि मानवतेच्या मूल्यांचा जागर करण्यात येत असतो तसेच सम्राट अशोक यांच्या धम्मविजयाच्या परंपरेचे स्मरण करून प्रज्ञा, शील आणि करुणेचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न आम्ही कायम करत राहू” असे नमूद केले. तद्नंतर संस्थेच्या वतीने अल्पोहार देऊन प्रथम सत्राची सांगता करण्यात आली.

कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात ग्रामपंचायत सदस्य संजय वाघमारे यांचे स्वागत करण्यात आले त्यावेळी संजय वाघमारे साहेबांनी उपस्थितांना मार्गदर्शन करून आपले मौलिक विचार मांडले. सायंकाळी विनोद कदम निर्मित भीमसंदेश कलामंच, मुंबई या गायन पार्टीचे गायक रवींद्र कांबळे, गायक संतोष जाधव आणि महामानव विचार मंच संस्थेचे गायक रुपेश यादव यांच्या सुमधुर आवाजात बुद्ध-भीम गीतांचा बहारदार कार्यक्रम सादर करण्यात आला ज्याला रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला सोबतच जेष्ठ सभासदा शशिकला यादव आणि चिमुरडी सभासदा रूही मोरे यांनी ही गीत सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकून घेतली.

अधिक वाचा  केंद्र सरकारने 15 ते 20 वर्षांचे यंदा धोरण बदलले; शेतकऱ्यांच्या तोंडाला पुन्हा पाने? देशातील साखर उद्योगाच गणित कोलमडणार

“अण्णं बलं च वण्णं च, पटिभानं च ददति सो।
आयूं च सुखं च पेच्च, भोजनं देन्तो लभति सो॥” या पाली भाषेतील प्रसिद्ध धम्मपदाला आणि दश पारमिता मधील पहिली दान पारमिता अनुसरून सुरेश शिरसाठ आणि तुषार यादव यांनी महामानव विचार मंच संस्थेच्या वतीने उपस्थितांना भोजनदान दिले, कार्यवाहक गणेश पेंडुरकर, संस्थेचे सभासद व महिला मंडळ यांनी स्वतः बनविलेल्या रुचकर भोजनाने उपस्थितांचे मन व पोट दोन्ही तृप्त झाले.

संचालक स्वप्नील यादव यांनी आपले मतं मांडत असताना महामानव विचार मंच ही संस्था सामाजिक बांधिलकी जपत धम्मविषयक उपक्रम, वैचारिक प्रबोधन आणि समाजजागृतीच्या माध्यमातून समताधिष्ठित समाजनिर्मितीसाठी कार्यरत आहे. महामानवांचे विचार केवळ उत्सवापुरते मर्यादित न ठेवता ते दैनंदिन जीवनात आचरणात आणणे, नव्या पिढीपर्यंत बुद्ध-भीम विचारांचा वारसा पोहोचविणे आणि समाजामध्ये बंधुभाव वृद्धिंगत करणे, हा अशा आयोजनामागील प्रमुख उद्देश असल्याचे अधोरेखित केले.

अधिक वाचा  बाल्कनीतील कपड्यांवर निर्बंध घालण्यापूर्वी पुणे महापालिकेने कचरा व्यवस्थापनातील त्रुटी दूर कराव्यात: पतित पावन संघटनेची मागणी

कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यात सरणत्तय घेऊन सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या संचालक स्वप्नील भगवान यादव, उपाध्यक्ष संजय कांबळे, कार्याध्यक्ष प्रवीण रा. रसाळ, चिटणीस रुपेश भगवान यादव, खजिनदार हरेश खैरे, सल्लागार भगवान यादव, गोविंद पडवणकर, कार्यवाहक गणेश पेंडुरकर, तुषार यादव, निनाद जाधव, सुरेंद्र साखरे, सूरज कांबळे, संदेशवाहक अमोल वाघमारे, महिला मंडळाच्या शशिकला यादव, रुपाली मोरे, वैशाली रसाळ, तृप्ती यादव, तन्वी यादव, प्रीती यादव, शालिनी पेंडुरकर, जाधव ताई, सुजाता खैरे, कविता काळे यांचे तसेच निस्वार्थ सहकार्य करणारे गणेश मंडप डेकोरेटर्सचे सर्वेसर्वा अण्णा जुवेकर, भांडी संयोजक वाघमारे, साउंड संयोजक सुशील सातपुते, सुमित कांबळे, यश पवार आणि उपस्थितांचे आभार मानून अध्यक्ष सुरेश शिरसाठ यांनी कार्यक्रमाची सांगता केली.