पुणे महापालिकेचा मोठा निर्णय १५ पासून अंमलबजावणी; 10% पाणी कपातीसाठी नामी शक्कल! या दिवशी नळाला पाणी नाही 

0

दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारने दिलेल्या १० टक्के पाणीकपातीच्या आदेशाची महापालिकेने गांभीर्याने दखल घेतली आहे. त्यानुसार शहरात प्रत्येक गुरुवारी संपूर्ण पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १५ ऑक्टोबरपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार असून, पुणेकरांना पाण्याचा काटकसरीने वापर करावा लागणार आहे.

‘अल निनो’च्या प्रभावामुळे यंदा कमी पाऊस झाला असून, हा प्रभाव पुढील वर्षापर्यंत राहण्याची शक्यता आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांना उपलब्ध पाणीसाठ्याचे ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत काटकसरीने नियोजन करण्याचे आदेश दिले आहेत. १५ ऑक्टोबरपासून पाणी वापरात किमान १० टक्के कपात करून उपलब्ध साठा ऑगस्ट २०२७ पर्यंत पुरवण्याचे नियोजन करण्याच्या सूचना सरकारने मागील आठवड्यात दिल्या होत्या. त्यानुसार पाटबंधारे विभागाने पुणे महापालिकेला १० टक्के पाणी कपातीबाबत पत्र पाठवले होते. या पार्श्वभूमीवर आयुक्त नवल किशोर राम, अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर, पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप व वरिष्ठ अधिकाऱ्यांची सोमवारी बैठक झाली. यात १० टक्के कपातीचा निर्णय घेण्यात आला.खडकवासला धरण साखळीमध्ये १२ ऑक्टोबरअखेर २६.२२ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. हा साठा दरवर्षीच्या तुलनेत कमी आहे. खडकवासला धरणसाखळी, भामा आसखेड आणि पवना धरणातील पाणीसाठा तसेच आगामी काळातील पाण्याची गरज याचा आढावा महापालिकेने घेतला आहे. दर गुरुवारी पाणीपुरवठा बंद ठेवल्यामुळे उपलब्ध साठ्याचा कार्यक्षम वापर होऊन भविष्यात शहराला पुरेसा पुरवठा करणे शक्य होणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.

अधिक वाचा  पुणे विधानपरिषद आमचे दोन्हीही उमेदवार उच्चशिक्षित मोठ्या फरकाने विजयी होणार; गोकुळवरून चंद्रकांत पाटलांनी ट्रोलर्संनाही सुनावलं

राज्य सरकारने दिलेल्या आदेशानुसार महापालिकेने १० टक्के पाणी कपातीचा निर्णय घेतला आहे. दर गुरुवारी शहराचा पाणीपुरवठा बंद असणार असून, येत्या गुरुवारपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे.

– पवनीत कौर, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

पाण्याचा काटकसरीने वापर करा

– पिण्याच्या पाण्याचा बांधकामासाठी वापर करू नये.

– बांधकामासाठी एसटीपी, बोअरवेल किंवा विहिरीचे पाणी वापरावे.

– घरे व आस्थापनांमधील गळती होणारे नळ दुरुस्त करावेत.

– खासगी आणि सार्वजनिक वॉशिंग सेंटर बंद ठेवावेत.

– स्विमिंग पूल आणि उद्यानांसाठी पिण्याच्या पाण्याचा वापर टाळावा.

– गृहनिर्माण संस्थांनी पाणी बचतीसाठी उपाययोजना राबवाव्यात.

अधिक वाचा  गोकुळचा ‘अध्यक्ष’निवड नवा ट्विस्ट; …तरच सतेज पाटलांनाच संधी? फक्त ही नोटीस सर्व २५ संचालकांना विहित वेळेत पाठवणे बंधनकारक

तक्रारींसाठी येथे संपर्क साधा

– टोल फ्री क्रमांक : १८००-१०३०-२२२

– व्हॉटस्‌अप क्रमांक : ९६८९९००००२

– संकेतस्थळ : www.pmc.gov.in

– पीएमसी केअर