बारामतीत मतदान विक्रमाचा ‘जादुई आकडा’ कोणता? नीचांकी मतदानाची तिसरी वेळ; चार मे रोजी मतमोजणी

0

बारामती पोटनिवडणुकीसाठी मतदारांमध्ये निरुत्साह राहिल्याने अवघे ५८.१७ टक्के मतदान झाले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासमोर प्रमुख राजकीय पक्षांचा एकही उमेदवार नसल्याने महायुतीकडून विक्रमी मताधिक्याचा दावा करण्यात येत आहे. दोन लाख २३ हजार ७०५ बारामतीकरांनी मतदान केले असून, त्यापैकी एक लाख ६५ हजार २६६ मते मिळाली, तरच मताधिक्याचा विक्रम होणार आहे. हा ‘जादुई आकडा’ उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार गाठणार का, याबाबत उत्सुकता असणार आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे झालेल्या या पोटनिवडणुकीत राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या महायुतीच्या उमेदवार आहेत. काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे यांनी माघार घेतल्यामुळे प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात नाहीत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह २३ उमेदवार आहेत. मतदानासाठी बारामतीकरांमध्ये निरुत्साह राहिल्याने अवघ्या ५८.१७ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

अधिक वाचा  सांगली जिल्हा बँकेत दिग्गजांचे अर्ज मागे, 21 पैकी 15 जागा बिनविरोध : पडळकर, घोरपडेंच्या गटात मात्र निवडणूकच होणार

या मतदारसंघात ३ लाख ८४ हजार ५७९ मतदार असून, त्यापैकी २ लाख २३ हजार ७०५ मतदारांनी मतदान केले. बारामतीतील मताधिक्याचा विक्रम दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावावर आहे. २०१९ मध्ये त्यांनी भाजपचे तत्कालीन उमेदवार गोपीचंद पडळकर यांचा एक लाख ६५ हजार २६५ मताधिक्याने पराभव केला होता. त्यामुळे आता विक्रम मोडण्यासाठी एक लाख ६५ हजार २६६ हा जादुई आकडा असणार आहे. चार मे रोजी मतमोजणी होणार असून, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या जादुई आकडा गाठणार का, याबाबत उत्सुकता असणार आहे.

बारामतीबाहेरचे उमेदवार किती मते घेणार?

या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे यांनी माघार घेतल्याने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासमोर २२ उमेदवार आहेत. त्यामध्ये प्रमुख राजकीय पक्षाचा एकही उमेदवार नाही. नोंदणीकृत राजकीय पक्ष असलेल्या न्यू राष्ट्रीय समाज पार्टीचे आर. वाय घुटूकडे हे आहेत. ते मूळचे सोलापूरमधील आहे. हिंदुस्थान जनता पार्टीचे सतीश कदम हे उमेदवार आहेत. ते जत येथील आहेत. उर्वरित २० जण हे अपक्ष आहेत. त्यामध्ये बारामतीतील आठजण आहेत.

अधिक वाचा  शासन आदेश ३०४ दुष्काळी तालुक्यांमध्ये जलसंधारणालाच प्राधान्य; प्रत्येक गावात १०० जलशोषक खड्डे, नाले खोलीकरण

अन्य अपक्ष हे बारामतीबाहेरील आहेत. त्यात धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे आणि ‘बिग बॉस मराठी’मधील अभिजित बिचुकले यांचा समावेश आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या विरोधात असलेले २२ उमेदवार किती मते घेणार, यावर जादुई आकडा गाठला जाणार की नाही, हे स्पष्ट होणार आहे.

नीचांकी मतदानाची तिसरी वेळ

बारामतीमध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार हे उमेदवार असताना मतदानाचे प्रमाण हे सरासरी ७० टक्क्यांहून अधिक राहिले आहे. ६० टक्क्यांहून कमी मतदान हे आतापर्यंत तीनवेळाच झाले आहे. यापूर्वी १९६२ मध्ये ५१.९६ टक्के मतदान झाले होते. बारामतीत सर्वांत कमी मतदान झालेली ही निवडणूक होती. तेव्हा काँग्रेसच्या मालतीबाई शिरोळे या निवडून आल्या होत्या. त्यानंतर आता झालेल्या पोटनिवडणुकीत ५८.१७ टक्के मतदान झाले. १९५२ मध्ये झालेल्या या मतदार संघाच्या पहिल्या निवडणुकीत ५८.६४ टक्के मतदान झाले होते. तेव्हा काँग्रेसचे गुलाबराव मुळीक हे विजयी झाले होते. नीचांकी मतदानाची ही तिसरी वेळ ठरली आहे.

अधिक वाचा  शिक्षक मतदारसंघातील मतदानादरम्यान उमेदवार ढसाढसा रडला, सर्व व्यवस्थेवरचा विश्वास उडालाय, मी इस्लाम स्वीकारणार