AISCA तर्फे डिजिटल अवेयरनेस कार्यक्रमाचे उद्घाटन आणि मोबाईल अ‍ॅपची घोषणा

0

पुणे — ऑल आयकॉनिक सीनियर सिटिझन्स असोसिएशन (AISCA) तर्फे वरिष्ठ नागरिकांसाठी आयोजित डिजिटल अवेयरनेस कार्यक्रमाचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले. हा उपक्रम संस्थेच्या अध्यक्षा शकीला शेख यांच्या संकल्पनेतून करण्यात आला. यावेळी संस्थेचे सल्लागार आणि कमिटी मेंबर किशोर सरपोतदार यांनी प्रास्ताविक केले. आपल्या भाषणात बोलताना त्यांनी या उपक्रमाचे महत्व विषद केले.

या वेळी संस्थेच्या समन्वयक सुनिला कवीटकर यांनी डिजिटल शिक्षण ज्येष्ठांसाठी किती महत्वाचे आहे या विषयी आपले मत व्यक्त केले. विजयंता के. यांनी मोबाईल ऍप ची माहिती दिली. या उपक्रमात डिजिटल अभ्यासक्रमामध्ये काय शिकवले जाणार आहे, याची माहिती माधुरी बिल्लाडे यांनी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शीतल वाघ यांनी केले. तांत्रिक बाजू सुहास घोडके यांनी सांभाळली.

अधिक वाचा  विधान परिषद 5 जागांसाठी आज मतदान 182 उमेदवार रिंगणात; सर्वत्र बंडखोरीची धास्ती पण ‘मैत्रीपूर्ण’ लढतचा मुलामा!

या प्रसंगी प्रख्यात लेखक व कवी श्री. तडवळकर, तसेच नवचैतन्य हास्य परिवाराचे अध्यक्ष श्री. प्रमोद धेपे तसेच स्नेहकुंजच्या संचालिका मृणाल राजहंस यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्यांनी आपल्या मनोगतातून वरिष्ठ नागरिकांनी डिजिटल युगाशी जुळवून घेणे किती महत्त्वाचे आहे, यावर भर दिला व AISCA च्या या उपक्रमाचे कौतुक केले.

कार्यक्रमामध्ये वरिष्ठ नागरिकांना स्मार्टफोनचा सुरक्षित वापर, ऑनलाइन व्यवहार, सोशल मीडिया, व्हिडिओ कॉलिंग यांसारख्या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. याचबरोबर AISCA च्या मोबाईल अ‍ॅपचे सादरीकरण करून त्यातील सुविधा—कार्यक्रमांची माहिती, हेल्थ टिप्स, ऑनलाइन उपक्रम व सदस्यांमधील संवाद—याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.

अधिक वाचा  एसएनडीटी मेट्रो स्टेशन वाहतूक कोंडी मुक्त? ‘या शासकीय जागेचा वापर करा’ पुनीत जोशी यांची आयुक्तांकडे ठोस मागणी

AISCA च्या अध्यक्षा शकिला शेख यांनी सांगितले की, या उपक्रमाचा मुख्य उद्देश वरिष्ठ नागरिकांना डिजिटलदृष्ट्या सक्षम बनवणे आणि त्यांचे सामाजिक आयुष्य अधिक सक्रिय व आनंदी करणे हा आहे.

कार्यक्रमाच्या शेवटी सर्व मान्यवरांचे संस्थेचे पदाधिकारी रवींद्र शाळू यांनी आभार मानले व भविष्यात अशा अनेक उपक्रमांद्वारे वरिष्ठ नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी AISCA कटिबद्ध असल्याचे सांगितले. या कार्यक्रमाला संस्थेचे स्मिता वाघ, अनिल कुलकर्णी आणि इतर सर्व पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते. उपस्थित नागरिकांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत पुढील उपक्रमांसाठी उत्सुकता दर्शवली.

अधिक वाचा  पदवीधर-शिक्षक मतदारसंघातील मतमोजणी कशी होते? प्रथम पसंतीत विजय झाला नाही तर पर्याय काय? सविस्तर वाचा