पोलिस स्टेशनमध्ये  12 च्या ठोक्याला बर्थडे सेलिब्रेशन; या पोलिसांचा प्रताप रील स्टारही लाजेल असे ड्रोन चित्रिकरण

0

पिंपरी चिंचवडमध्ये रस्त्यावर बर्थडे सेलिब्रेशन करण्याची, रात्री 12च्या ठोक्याला फटाक्यांचे बार लावण्याची अन् सेलिब्रेशनच्या नावाखाली धांगडधिंगा घालण्याची जणू प्रथाचं झाली आहे. बरं हा सगळा धिंगाणा बहुतांश वेळी पोलिसांनी नजरेस पडत नाही. हे बर्थडे सेलिब्रेशन धन दांडग्यांचे असल्याने पोलिस त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करतात. पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्यापर्यंत ही खबर पोहचू न देण्यासाठी हा खटाटोप सुरु असतो, हे उघड आहे. पण आता तर एका पोलीस शिपायाने हा सगळा राडा केला, तो पण थेट पोलिस स्टेशनच्या दारातचं.

अगदी एखाद्या रीलस्टारला लाजवेल असं ड्रोनद्वारे या बर्थडे सेलिब्रेशनचं चित्रीकरणही केलं. सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाच धुमाकूळ घालतोय. पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयातील पोलिस शिपाई प्रवीण पाटीलने हा प्रताप केला आहे. ज्यामुळं आख्ख्या पोलिस खात्याची मान शरमेने खाली गेली आहे. आता पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे या प्रकरणी काही कठोर कारवाई करणार याकडे शहरवासीयांचे लक्ष लागून आहे.

अधिक वाचा  शासन आदेश ३०४ दुष्काळी तालुक्यांमध्ये जलसंधारणालाच प्राधान्य; प्रत्येक गावात १०० जलशोषक खड्डे, नाले खोलीकरण

बुधवारचा दिवस संपताना अन् गुरुवारची सुरुवात होताना, प्रवीण पाटीलची मित्रमंडळी सांगवी पोलिस स्टेशन समोर जमू लागली. त्यात पोलिस स्टेशनमधील इतर सहकारी ही सहभागी झाले. केक, आकर्षक फटाके, ड्रोन अशी सगळी सोय करण्यात आली. मग काय बाराच्या ठोक्याला प्रवीणसह मित्र मंडळी पोलिस स्टेशन समोरील रस्त्यावर आले. रस्त्याच्या मधोमध टेबल टाकून बर्थडे सेलिब्रेशन सुरु झालं.

ड्रोनने चित्रिकरण, अफलातून व्हिडीओ एडिटिंग

दोघांनी फटाक्यांची फायर गण बाहेर काढली, दुसरीकडे स्काय शॉट आणि सुतळी बॉम्ब फुटू लागले. ही आतषबाजी बराचवेळी सुरु होती. जमाना रील्सचा आहे म्हटल्यावर याचं चित्रीकरण होणार नाही असं कसं होईल. मग हा सगळा कार्यक्रम ड्रोनद्वारे चित्रित करण्यात आला. भलेभले रीलस्टार सुद्धा लाजतील इतकं अफलातून एडिटिंग ही करण्यात आलं. मग काय दिवस उजाडताच हे व्हिडीओ प्रवीण अन् सहकाऱ्यांसह मित्र मंडळींच्या स्टेट्सवर अपलोड होऊ लागले.

अधिक वाचा  पुणे विधानपरिषद आमचे दोन्हीही उमेदवार उच्चशिक्षित मोठ्या फरकाने विजयी होणार; गोकुळवरून चंद्रकांत पाटलांनी ट्रोलर्संनाही सुनावलं

पिंपरी चिंचवड शहरात रात्री बाराच्या ठोक्याला धांगडधिंगा घालून बर्थडे सेलिब्रेशन करण्याचं फॅड आहेच. पण गुरुवारी रात्री साजरा झालेला बर्थडे हा पोलिसाचा असेल असं कोणी स्वप्नातही विचार केला नव्हता. बरं, पोलिस स्टेशनच्या दारात हे सगळं होत असताना, इतर पोलिसांचे कान अन् डोळे बंद होते का? असा प्रश्न आता सर्वांना पडलाय. बरं या महाशयांनी हा व्हिडीओ स्टेट्सला ठेवला. त्यामुळं पोलिस वर्दीचा कसा गैरफायदा घेऊ शकतात, हे समाजासमोर आलं.

पोलिस आयुक्त काय कारवाई करणार?

आता नेहमीप्रमाणे ही बाब पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्यापर्यंत कोणी पोहचू दिलीच नाही. पण एबीपी माझाच्या हाती हा व्हिडीओ लागला अन् पिंपरी चिंचवड पोलिसांच्या पायाखालची वाळू सरकली. हा व्हिडीओ पाहून वरिष्ठांनाही धक्का बसला. पण या व्हिडीओमुळं अख्ख्या पोलिस खात्याकडे बघण्याचा दृष्टिकोन मात्र बदलला. त्यामुळं पोलिस खात्याची मान शरमेने खाली गेली. आता पोलीस आयुक्त चौबे साहेब या पोलिस महाशयावर काय कठोर कारवाई करणार?  यानिमित्ताने रात्री बाराच्या ठोक्याला धांगडधिंगा घालत, साजरे होणारे बर्थडे सेलिब्रेशनची प्रथा कायमस्वरूपी बंद पाडणार का? याकडे शहरवासीयांचे लक्ष लागून आहे.

अधिक वाचा  पुणे पदवीधरमध्ये सोलापूर, शिक्षकमध्ये सातारा आघाडीवर शिक्षक मतदारसंघ ८५.८७ तर पदवीधर ६२.७८ टक्के मतदान