पुण्यात टोळी युद्धातून झालेल्या आयुष कोमकर या १८ वर्षीय तरुणाच्या निर्घृण हत्या प्रकरणात मुंबई हायकोर्टानं आंदेकर कुटुंबाला दिलासा दिला आहे. या प्रकरणातील एक आरोपी आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका लक्ष्मी आंदेकर तरुंगातून बाहेर येणार आहे. ॲड. विपुल दुशिंग यांनी याप्रकरणी आंदेकर यांच्यावतीनं युक्तीवाद केला.
हायकोर्टाचा निकाल काय?
मुंबई हायकोर्टानं लक्ष्मी उदयकांत आंदेकर यांना जामीन मंजूर केला आहे. त्यामुळं आंदेकर कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे. पण अजूनही बंडू आंदेकर आणि सोनाली आंदेकर हे दोघे आरोपी तुरुंगातच आहेत. लक्ष्मी आंदेकर यांनी जामिनासाठी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. यावर आज सुनावणी पार पडली, यावेळी विशेष सरकारी वकिलांनी आरोपीच्या सुटकेच्या आदेशाला चार आठवडे स्थगिती द्यावी अशी मागणी केली होती. पण याला आंदेकरांचे वकील ॲड. विपुल दुशिंग यांनी जोरदार विरोध केला.
लक्ष्मी आंदेकर यांचा या हत्या प्रकरणात सहभाग नव्हता, असं सांगत त्यासंबंधीचे परिस्थितीजन्य काही पुरावे सादर करत त्यांना अधिक काळ तुरुंगात ठेवता येणार नाही. त्यामुळं त्यांना याप्रकरणात नियमित जामीन मंजूर करण्यात यावा असा युक्तीवाद केला. त्यावर हायकोर्टानं सर्व बाजू ऐकून घेतल्यानंतर जामीन मंजूर केला. पण जामीन मंजूर केलेला असला तरी लक्ष्मी आंदेकर यांच्या तुरुंगातून सुटकेला विशेष सरकारी वकिलांनी विरोध केला. पण सुटका न करण्यासाठी ठोस कारण सांगू न शकल्यानं हायकोर्टानं सरकारी वकिलांची मागणी फेटाळून लावली, त्यामुळं लक्ष्मी आंदेकर यांचा तुरुंगातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला.
काय आहे प्रकरण?
पुण्यातील नाना पेठ भागातील कोमकर आणि आंदेकर या दोन गुन्हेगारी टोळ्या आहेत. सप्टेंबर २०२४ मध्ये माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी आयुष कोमकर या १८ वर्षीय तरुणाची ५ सप्टेंबर २०२५ रोजी गोळ्या घालून आणि धारदार शस्त्रानं वार करुन हत्या करण्यात आली होती. आयुष हा वनराज आंदेकर यांच्या हत्येतील आरोपी गणेश कोमकर याचा मुलगा होता, तर वनराज आंदेकर यांचा सख्खा भाचा होता. म्हणजेच वनराज आंदेकर यांचा खून हा त्याच्या सख्या बहिणीच्या नवऱ्यानंच (गणेश कोमकर) घडवून आणला होता.
याचा राग वनराजचे वडील कुख्यात गुंड बंडू आंदेकरला होता. त्यामुळं त्यानं आपला नातू आयुष कोमकर याची हत्या घडवून आणण्याचा कट रचला होता, हे पोलीस तपासात समोर आलं होतं. त्यामुळं पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने कुख्यात गुंड बंडू आंदेकरसह त्याची भावजय लक्ष्मी आंदेकर आणि सून सोनाली आंदेकर यांच्यासह १२ जणांना अटक केली होती. यांपैकी लक्ष्मी आणि सोनाली या दोघींनी तुरुंगात असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुणे महापालिकेची निवडणूक लढवली होती आणि निवडूनही आल्या होत्या.




