पुण्यावर पाणी कपातीचं संकट? गतवर्षीच्या तुलनेत ५.०३ टीएमसी कमी साठा कमी पवना, मुळशी धरणात किती पाणी?

0

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणांत मिळून २३.३७ टीएमसी (८०.१९ टक्के) उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षी ३ नोव्हेंबरला याच धरणसाखळीत २८.४० टीएमसी (९७.४१ टक्के) पाणीसाठा होता. त्यामुळे यंदा गतवर्षीच्या तुलनेत ५.०३ टीएमसीने साठा कमी आहे. दरम्यान, वरसगाव आणि पानशेत धरणांतून प्रत्येकी ६००, तर टेमघर धरणातून २६० क्युसेक विसर्ग सुरू आहे. चारही धरणांतील एकत्रित पाण्याची आवक शून्य नोंदविण्यात आली आहे.

मंगळवारी (ता. ३) सकाळी सहा वाजताच्या अहवालानुसार, खडकवासला धरणात १.१३ टीएमसी (५७.४७ टक्के),

वरसगावमध्ये १०.९२ टीएमसी (८५.१९ टक्के), पानशेतमध्ये ८.२० टीएमसी (७६.९९ टक्के),

तर टेमघरमध्ये ३.१२ टीएमसी (८४.२० टक्के) उपयुक्त पाणीसाठा आहे. चारही धरणांची एकूण पाणीसाठवण क्षमता २९.१५ टीएमसी आहे.

अधिक वाचा  तुकाराम मुंढे यांना मोठा झटका थेट एफडीएचा हा आदेश रोखला; पुण्यातील रांजणगावची ही राजाश्रयाची कंपनी ठरली कारणीभूत

वरसगाव धरणातील जलविद्युतगृहातून ६००, पानशेतमधून ६०० आणि टेमघरमधून २६० क्युसेक पाणी सोडले जात आहे. खडकवासला धरणातून सांडव्याद्वारे सध्या विसर्ग सुरू नाही. मात्र, खडकवासला धरणाच्या सांडव्याद्वारे आतापर्यंत १९.०५ टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे. धरणातून नवीन मुठा उजवा कालवा आणि पुणे महापालिकेसाठीही पाणी घेतले जात आहे. त्यानुसार कालव्यासाठी ११०३.५०, तर महापालिकेसाठी ६१८ क्युसेक पाणी सोडल्याची नोंद आहे.

पवना धरणात ९०.२२ टक्के साठा

खडकवासला धरणसाखळीबाहेरील पवना आणि मुळशी धरणांतील पाणीसाठाही समाधानकारक आहे. पवना धरणात ७.६७ टीएमसी (२१७.१६ दशलक्ष घनमीटर) म्हणजे ९०.२२ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. विसर्ग सुरू नाही.

अधिक वाचा  कोथरूडमध्ये आज सलग ११व्या वर्षी किरणदादांची भाऊबीज! दिवाळी सरंजाम वाटपाचा भव्य सोहळा; अमृता वहिनींच्या हस्ते अभिनेत्री स्नेहल तरडे यांचा नागरी सन्मान

मुळशी ७२.८३ टक्के

मुळशी धरणात १४.६८ टीएमसी (४१५.६७ दशलक्ष घनमीटर) म्हणजे ७२.८३ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. या दोन्ही धरणांतून सध्या विसर्ग सुरू नाही.

धरण परिसरातील पावसाची स्थिती

यंदाच्या पावसाळ्यात एक जून पासून खडकवासला धरण परिसरात एकूण ७९० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यापैकी मंगळवारी सकाळी सहा वाजेपर्यंत १२ मिलिमीटर पाऊस झाला. पानशेत येथे एकूण २३५५, वरसगाव येथे २२०८, तर टेमघर येथे ३२५२ मिलिमीटर पाऊस झाला आहे.

या तीनही धरण परिसरांत मंगळवारी सकाळपर्यंत पावसाची नोंद झालेली नाही. गतवर्षी ३ नोव्हेंबरपर्यंत खडकवासला येथे १२८१, टेमघर येथे ४३०७, पानशेत येथे २९६७ आणि वरसगाव येथे २८९० मिलिमीटर पाऊस झाला होता. त्या तुलनेत यंदा चारही धरण परिसरांत कमी पाऊस झाला आहे.

अधिक वाचा  एसएनडीटी मेट्रो स्टेशन वाहतूक कोंडी मुक्त? ‘या शासकीय जागेचा वापर करा’ पुनीत जोशी यांची आयुक्तांकडे ठोस मागणी

गतवर्षीच्या तुलनेत यंदा चारही धरण परिसरांत पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. खडकवासला येथे गतवर्षीच्या १२८१ मिलिमीटरच्या तुलनेत यंदा ७९० मिलिमीटर पाऊस झाला असून, त्यात ४९१ मिलिमीटरने (३८.३३ टक्के) घट झाली आहे. पानशेत येथे ६१२ मिलिमीटर (२०.६३ टक्के), वरसगाव येथे ६८२ मिलिमीटर (२३.६० टक्के), तर टेमघर येथे १०५५ मिलिमीटर (२४.५० टक्के) कमी पाऊस झाला आहे. चारही धरणांपैकी खडकवासला परिसरात पावसातील घट सर्वाधिक, तर पानशेत परिसरात सर्वांत कमी आहे.