पुणेकरांनो, उन्हाचा चटका आणखी वाढणार! मंगळवारपासून कमाल तापमान ३६ अंशांवर जाण्याचा अंदाज

0

पुणे: गेल्या काही दिवसांपासून शहरातील हवामानात सातत्याने चढ-उतार होत आहेत. मात्र पुढील तीन दिवस हवामान स्थिर राहणार असल्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. शहरात रविवारी कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस, तर किमान तापमानात २०.४ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले.

शहरात सकाळपासूनच काहीसे ढगाळ वातावरण होते. दुपारच्या वेळी उन्हाचा चटका वाढल्याने उकाड्यात देखील वाढ झाली होती. सायंकाळी मात्र पुन्हा ढगाळ वातावरण निर्माण झाले.शहर आणि परिसरात सोमवारी (ता. २६) कमाल तापमान स्थिर राहून ३५ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २० अंश सेल्सिअस नोंदविण्यात येणार आहे. आकाश मुख्यतः निरभ्र राहून दुपारी आणि सायंकाळी अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे.

अधिक वाचा  भाजपाचे पदवीधर, शिक्षक मतदार संघासाठी पुण्यावर विशेष लक्ष; कारवाईच्या भीतीने नगरसेवकांचा मतदारांशी संपर्क?

मंगळवारपासून (ता. २७) कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २३ अंश सेल्सिअसपर्यंत नोंदविण्यात येणार असल्याचे हवामानशास्त्र विभागाने सांगितले आहे.