मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी बीडमधील दसरा मेळाव्यातून उपमुख्यमंत्री तथा शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. एकनाथ शिंदेंनी त्यांचा मुलगा श्रीकांत शिंदे यांच्यामार्फत 500 कोटी रुपये मला दिल्याची चर्चा भाजपात आहे. त्याबाबत, त्यांनी दसरा मेळाव्यातून उत्तर द्यावं, असे आव्हान जरांगे पाटील यांनी दिले होते. मात्र, दसरा मेळाव्यातून एकनाथ शिंदेंनी याबाबत काहीही वक्तव्य केलं नाही. आता, पत्रकार परिषदेत बोलताना एकनाथ शिंदेंनी हे आरोप फेटाळले आहेत. मी कुणालाही 500 कोटी दिले नाहीत, किंवा घेतले नाहीत. जरांगे पाटलांनी शहानिशा करुन बोलावं, असे त्यांनी म्हटले.
दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील प्रमुख नेत्यांनी मनोज जरांगे पाटील यांना लक्ष्य केले. त्यामध्ये रामदास कदम आघाडीवर होते. रामदास कदम यांनी मनोज जरांगे यांची औकात काढत पुन्हा एकनाथ शिंदेंविरोधात बोलू नये, असा सज्जड दम भरला. त्यानंतर, पत्रकार परिषद घेत जरांगे पाटील यांनी, आता आपण पुरावे देणार असल्याचे म्हटले. मी तुमच्याकडे एका साध्या प्रश्नाचे उत्तर मागितले होते. मात्र, तुम्ही चिडताय, बावचळून गेला आहात. तुम्ही मला 500 कोटी रुपये दिले का, याबाबत हा किंवा नाही म्हणा. मी वाट बघतोय शिंदे साहेब काय बोलतात. थोड्या दिवसांत कळेलच की आपण बोलण्याआधी विचार करायला हवा होता, असे म्हणत आपण पुरावे देणार असल्याचे जरांगे पाटील यांनी म्हटले. आता, जरांगे पाटलांच्या आरोपावर पहिल्यांच एकनाथ शिंदेंनी आपली भूमिका मांडली.
नाशिकमधील सिंहस्थ कुंभमेळ्याचं निमंत्रण राष्ट्रपतींना देण्यासाठी एकनाथ शिंदे आज दिल्लीत होते. त्यावेळी, पत्रकारांशी बोलताना त्यांनी जरांगे पाटील यांच्या आरोपावर प्रतिक्रिया दिली. आमचे सर्व प्रवक्ते यावर बोलत आहेत, मी कुणालाही 500 कोटी दिले नाहीत, किंवा घेतले नाहीत. जरांगे पाटलांनी शहानिशा करुन बोलावं, असे एकनाथ शिंदेंनी म्हटलं. जरांगे पाटील यांच्याकडे काही पुरावे असतील तर त्यांनी द्यावेत, त्याची चौकशी झाली पाहिजे, मग दूध का दूध पानी का पानी होईल, असे म्हणत जरांगे पाटलांच्या आरोपवर त्यांनी प्रत्युत्तर दिलं.
राजकीय प्लॅटफॉर्म बनवू नये – एकनाथ शिंदे
जरांगे पाटील मराठा समाजाचं काम करत होते, तेव्हा मी मराठा समाजाला विविध कामांतून न्याय देण्याचं काम केलं. गेल्या 60 वर्षांत जे काम झालं नाही, ते आम्ही केलं. आजही मराठा समाजाचं आरक्षण टिकलेलं आहे. मराठा समाजाचंच काम मनोज जरांगे काम करत होते, त्यामुळे आम्ही त्यांना मदत दिली. त्यांनी राजकीय प्लटॅफॉर्म बनवू नये, असेही एकनाथ शिंदेंनी म्हटलं.



