उकाड्याने हैराण नागरिकांना दिलासा पुणे, अहिल्यानगर, साताऱ्यात धुवांधार; 3 नोव्हेंबरला कुठे-कुठे पाऊस पडणार?

0

महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. पुणे, अहिल्यानगर आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये पावसाने दमदाट बॅटिंग केली आहे. मुसळधार पावसामुळे रस्ते जलमय झाले आहेत. अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. तसेच काही ठिकाणी वाहतूक देखील मंदावली. अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. दरम्यान, पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. तर या पावसामुळे काही ठिकाणी शेतकरी चिंतेत पडले आहेत. अचानक आलेल्या पावसामुळे हाता तोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती शेतकऱ्यांना आहे. तर दुसरीकडे ऊस आणि ज्वारी पिकांसाठी हा पाऊस दिलासादायक असणार असल्याची चर्चा आहे.

पुण्याच्या हिंजवडी परिसरात जोरदार पाऊस

पुण्याच्या हिंजवडी परिसरात जोरदार पाऊस पडला . अचानक आलेल्या पावसाने हिंजवडी परिसरातील नागरिकांची चांगलीच त्रेधातिरपीट झाली. मुसळधार आलेल्या पावसामुळे हिंजवडीत आयटी पार्क परिसरात रस्त्यांवर पाणी साचले. यामुळे रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला.

अधिक वाचा  सामाजिक बांधिलकीचा संवेदनशील ‘दीपक’; संघनिष्ठ दृढसंकल्पी कार्यकर्त्याचा खासदिनीही संवेदनशील उपक्रम

उद्घाटनाआधीच मान मेट्रो स्टेशनला गळती

पुण्यात अचानक आलेल्या पावसाने मेट्रो कामांबाबतही प्रश्न उपस्थित केले. शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रोचे सध्या काम सुरु असून लवकरच प्रवाशासाठी सुरु होणार आहे. पण उद्घाटनाआधीच शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रोच्या मान स्टेशनला गळती लागलेली बघायला मिळाली. येत्या 3 नोव्हेंबरला या मेट्रो लाईनचे उद्घाटन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या मेट्रोचे उद्घाटन होणार आहे. पण त्याच्या दोन दिवसाआधीच मेट्रो स्थानकात मोठ्या प्रमाणात गळती होत असल्याचे व्हिडीओ समोर आले आहेत. मान मेट्रो स्थानकाच्या नव्या इमारतीत गळती लागल्याने बांधकामाबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

अधिक वाचा  कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये आज गोकुळची ऐतिहासिक सुनावणी, महायुतीचे 12 संचालक उपस्थित? शशिकांत पाटील-चुयेकर यांची निवड टिकेलं?

अहिल्यानगर आणि साताऱ्यातही मुसळधार पावसाची हजेरी

सातारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडला आहे. सातारा शहरासह ग्रामीण भागात पावसाने हजेरी लावली आहे. अचानक आलेल्या पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचलं. यासोबत रस्ते देखील जलमय झाले. याशिवाय अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड शहरातदेखील आज पावसाने हजेरी लावली. जामखेडमध्ये ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडला आहे.

हवामान विभागाचा अंदाज काय?

बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण झाले आहे. यामुळे महाराष्ट्राच्या वातावरणावर त्याचा परिणाम होताना दिसत आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आज पाऊस पडल्यानंतर पुढच्या दोन ते तीन दिवसांमध्ये देखील पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, 2 नोव्हेंबरला रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर जिल्हा आणि कोल्हापूर घाट परिसर, सातारा या जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाकडून या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या काळात वाऱ्याचा वेग हा 40 ते 50 किमी प्रतितास असण्याची शक्यता आहे.

अधिक वाचा  मायक्रोसॉफ्टमधून एआयमुळे 60 हजार नोकऱ्यांवर गदा, 1 डिसेंबरचा वेळ दिला एआय टेक्नोलॉजीवर अधिक लक्ष केंद्रीत

3 नोव्हेंबरला कुठे-कुठे पाऊस पडणार?

हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, कोल्हापूर घाट परिसर, नांदेड, लातूर, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर 4 नोव्हेंबरसाठी कोल्हापूर जिल्हा, कोल्हापूर घाट परिसर, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.