पुणेकरांच्या वाहनांना नवी ओळख! आता ‘एमएच ६१’; ‘एमएच १२ वन ए’च्या पर्यायावर विचार करु सध्या काही तांत्रिक अडचणी काय?

0

पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ) वाहनांना देण्यात येणाऱ्या ‘एमएच-१२’ नोंदणी क्रमांकांची दोन अक्षरी मालिका संपत आल्याने पुण्यासाठी ‘एमएच-६१’ ही नवीन नोंदणी मालिका देण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.सध्याची ‘एमएच-१२’ मालिका अवघ्या दोन दिवसांत संपण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवीन वाहनांची नोंदणी खोळंबू नये यासाठी ‘एमएच-६१’ ही मालिका उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आली आहे.

‘एमएच-१२-झेडझेड’ मालिका सुरू

‘एमएच-१२’ची मालिका कायम ठेवण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी प्रयत्न केले होते. मात्र, नव्या क्रमांक रचनेत तांत्रिक अडचणी येत असल्याने त्यावर अंतिम निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे पुण्यासाठी स्वतंत्र ‘एमएच-६१’ मालिका देण्यात येणार आहे. पुणे आरटीओकडून सध्या दुचाकींसाठी ‘एमएच-१२-झेडझेड’ मालिका सुरू आहे. दोन अक्षरी मालिकेतील उपलब्ध पर्याय संपले असून, या क्रमांकाची नोंदणी काही दिवसांमध्ये संपण्याची शक्यता आहे.

अधिक वाचा  पुण्यात ७५ किलोमीटर लांबीचे नवे सायकल ट्रॅक उभारणार; महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांचे निर्देश

दोन अक्षरांऐवजी तीन इंग्रजी अक्षरांची मालिका

पुण्याची वाहन नोंदणी मालिका संपत आल्यामुळेपुणे आरटीओने वेगवेगळे पर्याय असलेले प्रस्ताव दिले होते. त्यामध्ये दोन अक्षरांऐवजी तीन इंग्रजी अक्षरांची मालिका सुरू करण्याचा प्रस्ताव दिला होता. ‘एमएच-१२-एएए-१२३४’ अशा स्वरूपाचा क्रमांक देण्याचा विचार होता. मात्र, क्रमांकाची लांबी वाढल्यास सीसीटीव्ही आणि स्वयंचलित नंबरप्लेट ओळख प्रणालींना तो स्पष्टपणे टिपण्यात अडचणी येण्याची शक्यता होती. त्यामुळे हा प्रस्ताव मागे पडला.

सध्या काही तांत्रिक अडचणी

त्यानंतर ‘एमएच १२ १ ए’ प्रस्ताव दिला होता. हा क्रमांक मिळेल, असे सर्वांना वाटत होते; पण त्यामध्ये सध्या काही तांत्रिक अडचणी येत असल्याचे समजते. त्या सोडविण्यासाठी वेळ नसल्यामुळे तातडीने पुण्याला ‘एमएच ६१’ ही नवीन मालिका देण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे गाड्यांची नोंदणी थांबवणार नाही. पुणे आरटीओकडे जुलै २०२६पर्यंत ४४ लाख ७१ हजारांहून अधिक वाहनांची नोंद आहे. वाहनसंख्या सातत्याने वाढत असल्याने नोंदणी क्रमांकांची मालिका वेगाने संपत आहे. त्यामुळे ‘एमएच-६१’ मालिका उपलब्ध झाल्याने नवीन वाहनांच्या नोंदणीतील संभाव्य अडथळा दूर होणार आहे.

अधिक वाचा  चंद्रकांतदादांच्या रणनीतीमुळे पुणे ‘शिक्षक’ची अशक्य जागा विजयी; पण सर्वत्र धुमधडाका करूनही ‘पदवी’मात्र मिळाली नाही

‘एमएच १२ वन ए’च्या पर्यायावर विचार करु

पुणे आरटीओकडून ‘एम एच १२ वन ए’ या वाहन मालिकेचा पर्याय असलेला प्रस्ताव मंत्रालयाकडे देण्यात आलेला आहे. वाहन क्रमांकाची ही मालिका देण्यासाठी काही तांत्रिक बदल करावे लागणार आहेत. त्यासाठी पर्यायदेखील खुला ठेवला आहे; पण अगोदर पुण्यासाठी ‘एमएच ६१’ दिल्यानंतरही ‘एमएच १२ वन ए’ ही मालिका काही महिन्यांनी मिळू शकते. वाहनचालकांना कोणत्या क्रमांकाची वाहन नोंदणी मालिका घ्यायची हा पर्याय त्यांना निवडावा लागेल; तसेच काही तांत्रिक अडचणी आल्यास तो मिळणार देखील नाही.