देशभरात ‘जेन झी’चा प्रभाव; राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात आता ‘जेन झी’ कडे जबाबदारी नवमतदार आकर्षित करण्याची व्यूहरचना

0

दिल्लीत जंतरमंतरवर तरुणांच्या आंदोलनानंतर ‘जेन झी’ चर्चेत आले असताना आता राजकीय पक्षांनीही बदलत्या वातावरणाची दखल घेत युवकांना पक्षात स्थान देण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पक्षांतर्गत बदल केले असून युवक, विद्यार्थी आणि युवती या तीन विभागांच्या प्रदेशाध्यक्ष पदावर नवीन चेहऱ्यांना संधी देऊन तरुणांच्या हातात नेतृत्त्व सोपविले आहे. जंतरमंतरवरील आंदोलनानंतर देशभरात ‘जेन झी’चा प्रभाव वाढला आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी संघटनात्मक फेररचना करताना युवकांना प्राधान्य दिले आहे. त्यानुसार राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निर्मला नवले, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी ॲड. चिन्मय गाडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निखिल ठाकरे आणि राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी वैशाली नागवडे यांची नियुक्ती केली आहे. युवक, विद्यार्थी आणि युवती या विभागांद्वारे तरुण आणि नवमतदारांना आकर्षित करण्याची व्यूहरचना ‘राष्ट्रवादी’ ने आखली आहे. त्यानुसार हे बदल करण्यात आले आहेत.

अधिक वाचा  Fssaiची घटनाबाह्य समांतर अंमलबजावणी यंत्रणा; तुकाराम मुंडेची थेट मुंबई हायकोर्टात धाव, अधिकार हिरावून घेतले नेमका दावा काय?

राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी यापूर्वी संध्या सोनवणे या होत्या. त्यांच्या जागी निर्मला नवले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी ॲड. चिन्मय गाडे यांची निवड झाली आहे. यापूर्वी प्रशांत कदम हे या पदाची जबाबदारी सांभाळत होते. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांच्याऐवजी निखिल ठाकरे यांच्याकडे युवक प्रदेशाध्यक्ष पदाचा कार्यभार सोपविण्यात आला होता. लातूर येथे अखिल भारतीय छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण प्रकरणी सूरज चव्हाण यांना या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्या जागी आता ठाकरे यांची नियुक्ती झाली आहे. भोंदू अशोक खरात प्रकरणात वादग्रस्त ठरल्याने महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिला होता. त्या जागी पुणे जिल्ह्यातील दौडमधील वैशाली नागवडे यांची नियुक्ती झाली आहे.

अधिक वाचा  २-२-१ वारं फिरलं..! शिक्षक-पदवीधर निवडणुकीत राष्ट्रीय पक्षांना ‘कही खुशी कभी गम’चा धक्का; धक्कादायक अंदाज

राष्ट्रवादी (काँग्रेस शरद) पवार पक्षाकडूनही बदल

राष्ट्रवादी (काँग्रेस शरद) पवार पक्षानेही नुकतेच पक्षांतर्गत बदल केले आहेत. त्यानुसार युवक प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी विशाल वाकडकर यांच्याकडे देण्यात आली आहे. विद्यार्थी प्रदेशाध्यक्षपदी सुशील बेर्डे यांची नियुक्ती केली आहे. युवती आघाडीचे शहर आणि ग्रामीण असे दोन प्रदेशाध्यक्ष नेमण्यात आले ओहत. त्यानुसार मनाली भिलारे यांची शहर युवती प्रदेशाध्यक्षपदी, तर अमृता कालदाते यांची ग्रामीण युवती प्रदेशाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रवादी (काँग्रेस शरद) पवार पक्षानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षानेही फेरबदल करून तरुणांच्या हाती सूत्रे सोपविली आहेत.

अधिक वाचा  पुणे पदवीधरमध्ये सोलापूर, शिक्षकमध्ये सातारा आघाडीवर शिक्षक मतदारसंघ ८५.८७ तर पदवीधर ६२.७८ टक्के मतदान