शरद मोहोळ खून प्रकरण ‘त्या’ आरोपीला मोठा झटका; ‘यामुळे’ गुन्ह्याची पूर्वकल्पना दिसते जामीनही फेटाळला

0

कुख्यात गुंड शरद मोहोळ खून प्रकरणात आरोपी असलेल्या वकिलाचा जामीन अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळला. आरोपीचा गुन्ह्यातील कट कारस्थानातील सहभाग तसेच गुन्ह्यानंतर आरोपींना मदत केल्याचे प्रथमदर्शनी पुरावे आढळत असल्याचे नमूद करीत न्यायालयाने हा आदेश दिला. संजय उधाण असे या वकिलाचे नाव आहे. विशेष सरकारी वकील ॲड. प्रदीप सिंग राजपूत तसेच मूळ फिर्यादी याचे वकील ॲड. खेतराम सोलंकी, ॲड. सोहम यादव, ॲड. संकेत राव आणि ॲड. तेजस सावंत यांनी जामीन अर्जाला विरोध केला.

घटनेनंतर लगेचच आरोपी संजय उधाण यांचा मुख्य आरोपी नामदेव कानगुडे याच्याशी फोनवर संपर्क झाला होता आणि त्यानंतर ते घटनास्थळी पोहोचले. तेथून त्यांनी गोळीबार करणारा साहिल पोळेकर, नामदेव कानगुडे आणि चंद्रकांत शेळके यांना आपल्या गाडीतून पळून जाण्यास मदत केली. उधाण यांनी सहआरोपी वकील रवी पवार यांच्याशी संपर्क साधून इतर आरोपींना गाडीतून हलविण्याची व्यवस्था केली.

अधिक वाचा  महामानव विचार मंच संस्थेच्या वतीने ७० वा धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात संपन्न

तसेच, सहआरोपींना सीम कार्ड नष्ट करण्याचा सल्ला दिला गेला आणि खेड-शिवापूर टोल नाक्याजवळ नवीन सीम कार्ड पुरविण्यात आले. आरोपीने नवी मुंबई क्राइम ब्रांचमधील अधिकाऱ्याशी संपर्क साधून आत्मसमर्पणाची चर्चा करण्याचाही प्रयत्न केला होता, यावरून त्यांना गुन्ह्याची पूर्वकल्पना असल्याचे दिसून येते, असा युक्तिवाद जामिनाला विरोध करताना करण्यात आला.