थेऊरचा ‘यशवंत’ पुन्हा संकटात? १०० एकरनंतर आता यंत्रसामग्री विकण्याचा घाट?; संचालकांचे हे स्पष्टीकरण

0

थेऊर (ता. हवेली) येथील श्री चिंतामणी यशवंत सहकारी साखर कारखान्याची 100 एकर जमीन पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीला विक्री करण्याचा व्यवहार आधीच वादाच्या भोवर्‍यात अडकलेला असताना, कारखान्याची उर्वरित 124 एकर जमीन भाडेपट्ट्याने द्यायची आणि कारखान्याची यंत्रसामग्री विकण्याचा प्रयत्न सुरु असल्याची चर्चा समोर आली आहे. त्यामुळे सभासदांमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. यशवंत साखर कारखान्याची मालकीची सुमारे 248 एकर जमीन होती. त्यापैकी कर्जफेडीसाठी 24 एकर जमीन आधीच एका खासगी कंपनीने विकत घेतली आहे. बँका, सभासद, कर्मचारी व इतर देणी भागवण्यासाठी आता 100 एकर जमीन बाजार समितीला विकण्यात येणार आहे.

अधिक वाचा  पुणे पदवीधर निवडणूक : हर्षदा देशमुखांनी पाहिल्या फेरीतच विजय आणला दृष्टीक्षेपात; कोटापूर्तीस अवघ्या ७३६ मतांची गरज! लादलेल्या उमेदवारीबाबत कार्यकर्त्यांचा स्पष्ट संदेश?

आज सोमवारी (दि. 16) झालेल्या कारखान्याच्या संचालक मंडळाच्या मासिक बैठकीत कारखाना पुनर्जीवित करण्याऐवजी जमीन, गोडाऊन भाड्याने देणे, यंत्रसामग्री स्क्रॅपमध्ये विकण्याचा काही संचालकांनी घाट घातला आहे, अशी चर्चा परिसरात सुरु झाली आहे.

विशेष म्हणजे 100 एकर जमिनीचा व्यवहार महसूल विभागाच्या मंजुरी अभावी प्रलंबित असतानाच, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्याच महिन्यात स्पष्ट आदेश देत परवानगीशिवाय कोणताही व्यवहार करू नये, असे बजावले होते. तरीही उर्वरित 124 एकर जमीन भाड्याने देण्याबाबत हालचाली सुरू असल्याची जोरदार चर्चा आहे.

सर्व नियम धाब्यावर बसवून थेट सभासदांच्या भवितव्यावर घाला घालत असल्याचा आरोप तीव्र होत आहे.23 जानेवारी 2026 रोजी कारखाना अधिकृतपणे संचालक मंडळाच्या ताब्यात आल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच भंगार, जमीन आणि मालमत्तेचे निर्णय झपाट्याने घेतले जात आहेत.

अधिक वाचा  एसएनडीटी मेट्रो स्टेशन वाहतूक कोंडी मुक्त? ‘या शासकीय जागेचा वापर करा’ पुनीत जोशी यांची आयुक्तांकडे ठोस मागणी

हजारो सभासद, कर्मचारी आणि ऊस उत्पादक शेतकरी कारखाना सुरू होईल या आशेवर वाट पाहत आहेत. मात्र कारखाना सुरू करण्याबाबतीत एक शब्द उच्चारण्यात आला नाही. पण विक्री आणि भाडेपट्ट्यावर जमीन देण्याच्या हालचाली झपाट्याने दिसून येत आहे.

“हे सर्व आरोप बिनबुडाचे असून यामध्ये काहीही तथ्य नाही. पुणे सोलापूर महामार्गचे काम थोड्या दिवसातच सुरु होणार आहे. कामाचे टेंडर मिळविलेल्या कंपनीला साहित्य व गाड्या लावण्यासाठी 100 ते 125 एकर जागा भाड्याने लागणार आहे. आपल्या कारखान्याचा फायदा होईल, त्यादृष्टीने एका संचालकाने मासिक बैठकीत वरील विषय मांडला आहे; परंतु, यावर कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे सभासदांना गोंधळून जाण्यासारखे काहीही कारण नाही.”

अधिक वाचा  केंद्र सरकारचा मोठा निर्णय निर्बंध हटवले, चांदी स्वस्त होणार… सहा महिन्यांसाठी 6500 मेट्रिक टन चांदी आयातीला मंजुरी

– सुभाष जगताप, अध्यक्ष श्री चिंतामणी यशवंत सहकारी साखर कारखाना, थेऊर