पुणे महापालिका सर्वत्र ‘स्थायी’साठी रस्सीखेच सुरू; भाजपच्या १२ जागी आयातांची चांदी की निष्ठिताला गादी?

0

पुणे : पुणे शहरामध्ये नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा महापालिकेमध्ये भरघोस मतांनी विजयश्री खेचून आणला आहे. पुणे महापालिकेतील सत्ता कायम ठेवण्यासाठी भारतीय जनता पक्षाने प्रभाग नुसार सूक्ष्म नियोजन करून निष्ठावान आणि आयात सर्व उमेदवारांना एकत्र विजयी करण्यात यश मिळवले आहे. पुणे महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर निवडीमध्ये हा संयम पाळत मित्रपक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांना उपमहापौरपदी संधी देत सर्वांना सन्मान देण्याची भूमिका कायम ठेवली आहे. महापालिकेच्या स्थायी समितीच्या सदस्यांची नियुक्ती गुरुवारी (१३ फेब्रुवारी) होणार आहे. स्थायी समितीच्या सदस्यपदी वर्णी लावण्यासाठी सत्ताधारी भारतीय जनता पक्षामध्ये जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. यत्र तत्र सर्वत्र भाजप! या भूमिकेतून अनेक पक्षप्रवेश केलेल्या सभासदांना दिलेल्या शब्दांनुसार स्थायी समितीत भाजपच्या १२ जागी आयातांची चांदी होणार की निष्ठिताला मानाच्या गादीसह विशेष समित्यांमध्ये सदस्यांचीही नियुक्ती करण्यात येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अधिक वाचा  शिक्षक मतदारसंघातील मतदानादरम्यान उमेदवार ढसाढसा रडला, सर्व व्यवस्थेवरचा विश्वास उडालाय, मी इस्लाम स्वीकारणार

महापालिका निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर महिन्याभराच्या आत सर्वसाधारण सभा घेऊन महापौर आणि उपमहापौरांची निवड करण्यात आली आहे. त्याच सभेच्या अजेंड्यावर स्थायी आणि विषय समित्यांच्या सदस्य नियुक्तीचा प्रस्ताव ठेवणेही आवश्यक आहे. त्यानुसार सोमवारी (९ फेब्रुवारी) झालेल्या विशेष सभेच्या अजेंड्यावर महापौर, उपमहापौरांसह स्थायी तसेच विषय समित्यांच्या नियुक्तीचा प्रस्ताव समाविष्ट करण्यात आला होता. मात्र, महापौर आणि उपमहापौरांची निवड आटोपताच सभा तहकूब करण्यात आली होती. त्यामुळे स्थायी समिती आणि विषय समित्यांच्या सदस्यांची नियुक्ती लांबणीवर पडली होती. शहराची तिजोरी अशी ओळख असलेल्या स्थायी समितीमध्ये एकूण १६ सदस्यांची नियुक्ती केली जाते. सध्याच्या राजकीय संख्याबळानुसार भाजपला १२ जागा, राष्ट्रवादी काँग्रेसला दोन, तर काँग्रेसला एका जागेची संधी मिळणार आहे. भाजपला बहुसंख्य जागा मिळणार असल्याने या १२ जागांवर कोणाची वर्णी लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठीही नगरसेवकांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. त्यानुसार पक्षांतर्गत समीकरणे जुळविण्यास सुरुवात झाली आहे.

अधिक वाचा  केंद्र सरकारने 15 ते 20 वर्षांचे यंदा धोरण बदलले; शेतकऱ्यांच्या तोंडाला पुन्हा पाने? देशातील साखर उद्योगाच गणित कोलमडणार