पुणे महापालिकेत ‘या’ तारखेपासून जनगणनेचा पहिला टप्पा; डिजिटल पद्धतीमुळे माहिती अधिक अचूक, जलद आणि पारदर्शक स्वरूपात संकलित होणार

0

केंद्र सरकारच्या जनगणना मोहिमेच्या पहिल्या टप्प्याची अंमलबजावणी पुणे शहरात करण्यात येणार असून, या टप्प्यात घरांची यादी तयार करणे आणि घरांची गणना हे काम १ मे ते १५ जून या कालावधीत केले जाणार आहे. ही प्रक्रिया महापालिका हद्दीतील १५ क्षेत्रीय कार्यालयांच्या कार्यक्षेत्रात राबविली जाणार आहे.

भारत सरकारच्या जनगणना संचालनालयाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या जनगणना २०२७ कार्यक्रमांतर्गत ही मोहीम होणार आहे. या मोहिमेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी राज्य जनगणना संचालनालयाच्या निर्देशानुसार ३ फेब्रुवारी रोजी महापालिकेत विशेष बैठक घेण्यात आली. या बैठकीत जनगणनेच्या पहिल्या टप्प्यातील कामकाजाची सविस्तर माहिती देण्यात आली असून, शहरातील १५ चार्ज जनगणना अधिकारी आणि शहर जनगणना अधिकाऱ्यांना आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले. जनगणनेचे सर्व कामकाज ठरवून दिलेल्या कालमर्यादेत पूर्ण करण्याच्या सूचना या वेळी देण्यात आल्या.

अधिक वाचा  विधान परिषद 5 जागांसाठी आज मतदान 182 उमेदवार रिंगणात; सर्वत्र बंडखोरीची धास्ती पण ‘मैत्रीपूर्ण’ लढतचा मुलामा!

यंदा भारतात प्रथमच जनगणना प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल पद्धतीने राबविण्यात येणार आहे. त्यामुळे प्रगणकांची नियुक्ती, त्यांचे प्रशिक्षण, तांत्रिक सुविधा आणि माहिती संकलनाची पूर्वतयारी शासनाच्या वेळापत्रकानुसार पूर्ण करण्यावर भर देण्यात आला आहे.

यासंदर्भात अतिरिक्त महापालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना जनगणना मोहीम यशस्वी करण्यासाठी आवश्यक ती सर्व तयारी तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. डिजिटल पद्धतीमुळे माहिती अधिक अचूक, जलद आणि पारदर्शक स्वरूपात संकलित होणार असून, पुणे शहरातील प्रत्येक घराची नोंद व्यवस्थित करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असणार आहे.