मुख्यमंत्री फडणवीसांची दिल्लीवारी ‘विधान परिषद’ ठरलं?; ‘या’ नावांची चर्चा पण पुन्हा धक्कातंत्रची शक्यता बळावली?

0

मुंबई: महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पाच रिक्त जागांसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 17 मार्च आहे. तर निवडणुका 27 मार्च रोजी होणार आहेत. विरोधी पक्षांसाठी पुरेसा मतांचा कोटा नसल्याने, महाविकास आघाडी या निवडणुकीत जवळजवळ नसल्याचं दिसून येत आहे. मात्र, दुसरीकडे महायुतीमधील प्रत्येक पक्षात जोरदार स्पर्धा वाढली आहे. तीनही पक्षातील नेते विधान परिषदेची आमदारकी मिळावी यासाठी सध्या जोरदार प्रयत्न करत आहेत.

महाआघाडीत भाजपला तीन, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांना प्रत्येकी एक जागा मिळणार आहे. हे तिन्ही पक्ष महाराष्ट्राच्या महायुती सरकारचा भाग आहेत. भाजप नेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत. तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्री आहेत.

अधिक वाचा  शिक्षक मतदारसंघातील मतदानादरम्यान उमेदवार ढसाढसा रडला, सर्व व्यवस्थेवरचा विश्वास उडालाय, मी इस्लाम स्वीकारणार

भाजप पुन्हा एकदा वापरणार धक्कातंत्र?

आतापर्यंत अशा प्रकारच्या निवडणुकांमध्ये भाजप उमेदवार देताना कायमच धक्कातंत्राचा वापर करत असल्याचे दिसून आले आहे. खरं तर सध्या राजकीय वर्तुळात दादाराव केचे, अमरनाथ राजूरकर आणि माधव भंडारी यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. पण भाजपचा इतिहास लक्षात घेता काही अनपेक्षित नावं देखील आपल्याला पाहायला मिळू शकतात.

‘या’ तीन नावाची जोरदार चर्चा

1. दादाराव केचे – माजी आमदार आर्वी विधानसभा मतदारसंघ. देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक सुमित वानखडे यांना या क्षेत्रातून संधी मिळाल्याने केचे यांचे पुनर्वसन करण्यात येऊ शकते.

2. अमरनाथ राजूरकर – माजी काँग्रेस आमदार आणि अशोक चव्हाण यांचे जवळचे. त्यांच्यासोबतच ते भाजपमध्ये देखील सामील झाले.

अधिक वाचा  बाल्कनीतील कपड्यांवर निर्बंध घालण्यापूर्वी पुणे महापालिकेने कचरा व्यवस्थापनातील त्रुटी दूर कराव्यात: पतित पावन संघटनेची मागणी

3. माधव भंडारी – हे भाजपचे दीर्घकाळ प्रवक्ते आहेत. जनसंघापासून ते पक्ष संघटनेपर्यंत सक्रिय आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून या दोन नावाची चर्चा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) कोट्यातही एक जागा आहे. यासाठी नावांवर विचार सुरू झाला आहे.

1. संग्राम कोते पाटील – राष्ट्रवादी युवक काँग्रेस आणि विद्यार्थी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं आहे. उत्तर महाराष्ट्रातील शिर्डी विधानसभा मतदारसंघातील तरुण चेहरा. क्रीडा, कला आणि सामाजिक क्षेत्रात व्यापक जनसंपर्क.

2. सुनील टिंगरे – वडगाव शेरी मतदारसंघाचे माजी आमदार. अजित पवार यांचे विश्वासू म्हणून ओळखले जातात. पुण्यातील पक्ष संघटनेच्या विस्तारात त्यांचे मोठे योगदान आहे.

अधिक वाचा  जरांगेंच्या जाहीर केलेल्या ऑडिओ क्लिपबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; शिष्टमंडळालाही हे आश्वासन?

शिवसेना (एकनाथ शिंदे गट) कडून 3 नावांची चर्चा

शिवसेना (एकनाथ शिंदे गट) च्या कोट्यातही एक जागा आहे. यासाठी दावेदारांची एक मोठी रांग आहे. तथापि, अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. पण काही नावांबाबत सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

1. रवींद्र फाटक – माजी विधान परिषद सदस्य. एकनाथ शिंदे यांच्या जवळचे आणि ठाण्याच्या स्थानिक राजकारणातील एक प्रमुख चेहरा.

2. शहाजी बापू पाटील – माजी आमदार, सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेचा ग्रामीण चेहरा.

3. शीतल म्हात्रे – शिवसेना प्रवक्त्या, माजी नगरसेविका. मुंबईत संघटना बांधण्याची मोठी जबाबदारी.