मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, डाऊन दिशेच्या गाड्या पूर्णपणे ठप्प

0

मुंबईकरांची लाईफलाईन असलेली मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत झाली आहे. टिटवाळा-खडवली दरम्यान मालगाडीचे कपलिंग तुटल्याने मध्य रेल्वे विस्कळीत झाली आहे. यामुळे डाऊन दिशेच्या सर्वच लोकल गाड्या पूर्णपणे बंद झाल्या असून प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. कसाऱ्याहून येणारी “गरीब रथ मेल” आसनगावला थांबवण्याची शक्यता आहे.

कसारा लोकलचा प्लॅटफॉर्म ओव्हरशूट

दरम्यान कसारा लोकलचा प्लॅटफॉर्म ओव्हरशूट झाल्याची घटना समोर आली आहे. मुलुंड स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वरून लोकल दोन डबे पुढे गेली. हा संपूर्ण प्रकार मंगळवारी सकाळी 9 वाजून 23 मिनिटांनी घडला, त्यानंतर लोकल 10 मिनिटं खोळंबली होती. त्यामुळे काही प्रवाशांना रुळांवर उतरून प्लॅटफॉर्मवर यावे लागले, तर मागच्या डब्यांतील प्रवाशांना गाडीत चढणे अतिशय कठीण झाले. गर्दीच्या वेळेस हा प्रकार झाल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

अधिक वाचा  ‘भाजपचा सत्ता-संपत्तीचा माज आत्ता बास सुशिक्षित स्वाभिमानी मतदार उतरवणार’; हर्षदा देशमुख-जाधव

मोटरमन के.जी. भावसार आणि ट्रेन मॅनेजर व्ही. सिंगापूर यांनी ही लोकल चालवली होती. मोटरमन ब्रेक वेळेवर न लावल्याने लोकल नियोजित ठिकाणी न थांबता पुढे गेल्याचे समोर आले आहे.

प्लॅटफॉर्म ओव्हरशूट हा गोंधळाचा प्रकार असला तरी Signal Passing at Danger (SPAD) पेक्षा कमी धोकादायक आहे. या घटनेच्या चौकशीचे आदेश रेल्वे प्रशासनाने दिले असून भविष्यातील उपाययोजनांवर भर देण्यात येणार आहे. .