NCP त काहीतरी वेगळंच घडतंय? अजितदादांची दांडी, भुजबळांची नाराजी, जयंतरावांची स्तुतीसुमने तटकरे-शरद पवार भेटीचीही चर्चा 

0

नाशिक: लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लक्षवेधी घडामोडी घडत आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये दिसलेले नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी १५ मे रोजी राज्याच्या दौऱ्यावर होते. त्यांच्या सभा दिंडोरी आणि कल्याणमध्ये झाल्या. मुंबईत रोड शो झाला. अजित पवार सभा, रोड शोला अनुपस्थित होते. मंत्री छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा आहे. तर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी शरद पवारांची हॉटेलमध्ये भेट घेतल्याची चर्चा सुरु झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार गेल्या काही दिवसांपासून सभा, रोड शोमध्ये दिसलेले नाहीत. मोदींच्या दौऱ्यातही ते कुठेच नव्हते. दिंडोरीतील मोदींच्या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसकडून छगन भुजबळ, तर कल्याणमधील सभेला सुनील तटकरे हजर होते. त्यामुळे अजित पवार नेमके आहेत कुठे, अशी चर्चा सुरु झाली. आज मोदींची मुंबईतील शिवाजी पार्कात सभा होत आहे. या सभेला अजित पवार उपस्थित राहणार असल्याचं कळतंय.

अधिक वाचा  सांगली जिल्हा बँकेत दिग्गजांचे अर्ज मागे, 21 पैकी 15 जागा बिनविरोध : पडळकर, घोरपडेंच्या गटात मात्र निवडणूकच होणार

नाशिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी न मिळाल्यानं छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा आहे. शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारात भुजबळ आणि त्यांचे कार्यकर्ते दिसत नाहीत. राष्ट्रवादीची नाशकात चांगली ताकद आहे. मात्र ती महायुतीच्या उमेदवारामागे उभी राहिली असल्याचं चित्र दिसत नाही. भुजबळांच्या भेटीसाठी भाजपचे मंत्री आणि संकटमोचक गिरीश महाजन आज भुजबळ फार्मवर पोहोचले. दोन्ही नेत्यांमध्ये काही वेळ चर्चा झाली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे काल नाशिकमध्ये होते. त्यांनी पत्रकार परिषद घेण्यासाठी भुजबळांना आमंत्रण दिलं होतं. पण प्रदेशाध्यक्षांनी आमंत्रित करुनही भुजबळ पत्रकार परिषदेला अनुपस्थित राहिले. आपण प्रचारात सक्रिय आहोत. कोणतीही नाराजी नाही, असं भुजबळांकडून वारंवार सांगण्यात येतं. पण ते प्रचारात फारसे दिसत नाहीत. त्यामुळे महायुतीची नाशिकची जागा धोक्यात आली आहे.

अधिक वाचा  पुणे पदवीधरमध्ये सोलापूर, शिक्षकमध्ये सातारा आघाडीवर शिक्षक मतदारसंघ ८५.८७ तर पदवीधर ६२.७८ टक्के मतदान

अजित पवारांची गैरहजेरी, भुजबळांची नाराजी अशा चर्चा सुरु असताना पहाटेच्या सुमारास नाशिकच्या एमरॉल्ड पार्कमध्ये घडलेल्या घटनांनी अनेकजण बुचकळ्यात पडले. पहाटे साडे चारच्या सुमारास तटकरे हॉटेलवर पोहोचले. अर्ध्या तासानंतर ते इथून निघाले. विशेष म्हणजे शरद पवारांचा मुक्काम याच हॉटेलात होता. या दोन नेत्यांची भेट झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

नाशिकच्या एमरॉल्ड हॉटेलमध्ये तटकरे येऊन गेल्याच्या वृत्ताला शरद पवार गटाचे आमदार अनिल देशमुखांनी दुजोरा दिला आहे. तटकरे साहेब येऊन गेल्याचं मला समजलं. त्यांची आणि माझी भेट झाली नाही. पण ते काही कार्यकर्त्यांना भेटले, अशी माहिती देशमुखांनी दिली. साथ सोडून गेलेल्यांना पु्न्हा सोबत घ्यायचं नाही, हे आमचं धोरण असल्याचं देशमुखांनी सांगितलं.

अधिक वाचा  नागपूर पदवीधर ६४.७६ टक्के मतदान वर्धा, गडचिरोलीत सर्वाधिक प्रतिसाद; नागपूरमध्ये निरुत्साहच टक्केवारीही घटली

दाव्यात तथ्य नाही, तटकरेंकडून भेटीचा इन्कार

अनिल देशमुखांच्या दाव्यात काडीमात्र तथ्य नाही. तुतारीचा पराभव होणार असल्याच्या भीतीनं ते नैराश्याच्या गर्तेत गेले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून अशी विधानं केली जात आहेत, असं तटकरे म्हणाले. ‘काल मी बराच प्रवास केला. मला वॉशरुमला जायचं होतं. चालकानं कार एमरॉल्ड हॉटेलमध्ये नेली,’ असा घटनाक्रम सांगत तटकरेंनी देशमुखांचा दावा फेटाळला.