महाराष्ट्रातील अभियांत्रिकी प्रवेशासाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या एमएचटी-सीईटी परीक्षेतील कथित गैरप्रकारांचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पुन्हा उपस्थित केलाय.पुण्यातील सीओईपी आणि मुंबईतील व्हीजेटीआय यांसारख्या नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थी मोठ्या संख्येने सीईटी परीक्षा देतात. अशा परीक्षेच्या प्रक्रियेतच गैरप्रकार होत असतील, तर गुणवंत विद्यार्थ्यांच्या संधीवर परिणाम होऊ शकतो, अशी भूमिका त्यांनी मांडली. परीक्षेतील कथित गैरप्रकार कशा पद्धतीने घडतात, याचे सादरीकरण करण्यात आले. काही शिक्षकांनी आणि संबंधित व्यक्तींनी दिलेल्या माहितीसह एक स्टिंग ऑपरेशनही पत्रकार परिषदेत दाखवण्यात आलं. जाणून घेऊ काय म्हटलं आहे रोहित पवारांनी?
काय आहे रोहित पवारांची पोस्ट?
विद्यार्थ्यांच्या भविष्याचा बाजार मांडणाऱ्यांचा पर्दाफाश! CET पेपरफुटीच्या काळ्या कारभाराचं स्टिंग ऑपरेशन! असं म्हणत रोहित पवारांनी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत महिला अधिकारी लाच मागताना दिसत आहेत. टॉप इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी २५ लाख रुपयांचा रेट सांगितला जात असल्याचा दावा करत त्यांनी स्टिंग ऑपरेशनमधील माहिती समोर आणली. या प्रकरणामुळे राज्यातील शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या आरोपांदरम्यान काही शिक्षकांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.रोहित पवार यांनी स्टिंग ऑपरेशन दाखवले. शिक्षक नारायण शिंगारे यांनी सीईटी परीक्षेतील कथित गैरप्रकारांविषयी माहिती दिल्याचे सांगण्यात आले. टॉप इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी २५ लाख रुपये मागितले जात असल्याचा दावा शिंगारे यांनी केला. या प्रकरणात स्थानिक पोलीस ठाणे आणि एसआयटीकडे गेल्यानंतरही गुन्हा दाखल झाला नसल्याचे त्यांनी सांगितले. स्टिंग ऑपरेशनमधील दावे आणि कथित व्यवहारांची स्वतंत्रपणे पडताळणी होणे आवश्यक आहे. संबंधित व्यक्ती किंवा संस्थेची बाजूही समोर येणे महत्त्वाचे आहे.
चंद्रकांत पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी
रोहित पवार यांच्या आरोपानुसार, Eduspark कंपनीला राज्यात विविध कामे देण्यात आली आहेत. मंत्री उदय सामंत यांच्या कार्यकाळात कंपनीला पहिल्यांदा काम मिळाल्याचा दावा त्यांनी केला. त्यानंतर चंद्रकांत पाटील आणि दीपक केसरकर यांच्या कार्यकाळातही कंपनीला कामे देण्यात आल्या असंही रोहित पवारांनी म्हटलं आहे. सीईटी प्रवेश प्रक्रियेतील कथित गैरप्रकारांवरून शिक्षक नारायण शिंगारे यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी केली. “चंद्रकांत पाटील मंत्री झाल्यापासून शिक्षणाची वाट लागली आहे. ते विद्यार्थ्यांना न्याय देऊ शकत नाहीत. ही शिक्षण व्यवस्था किडलेली आहे. हे तात्काळ थांबवले पाहिजे,” अशी टीका शिंगारे यांनी केली.




