अग्निवीरांसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय! सेवेत मिळणार २ वर्षांची मुदतवाढ; कायमस्वरूपी होण्याचा मार्गही मोकळा

0

सैन्यदलात ‘अग्निपथ’ योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या अग्निवीर सैनिकांसाठी केंद्र सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. ज्या अग्निवीरांचा चार वर्षांचा सेवाकाळ संपत आला होता, त्यांच्या सेवेला आणखी दोन वर्षांची मुदतवाढ देण्याची घोषणा चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल एन. एस.राजा सुब्रह्मण्यम यांनी बुधवारी केली.’द इंडियन एक्सप्रेस’ने या संदर्भातलं वृत्त दिलं आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाने या निर्णयाला मंजुरी दिली असून, यामुळे सर्व अग्निवीरांना सैन्यदलातील आपली सेवा पुढे चालू ठेवण्याची नवी संधी उपलब्ध झाली आहे.

वेतनात वाढ आणि उत्तम संधी

चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोन वर्षांच्या वाढीव कालावधीत अग्निवीरांना आकर्षक वेतन आणि अतिरिक्त सोयी-सुविधा मिळतील.याशिवाय, वाढीव दोन वर्षांचा कार्यकाळ यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या अग्निवीरांच्या कामगिरीचे मूल्यांकन केले जाईल. या मूल्यांकनाच्या आधारे पात्र अग्निवीरांना भारतीय सैन्यदलात कायमस्वरूपी रुजू होण्याची संधी देखील मिळू शकते.

अधिक वाचा  सातारा जिल्हा बँकेत जयकुमार गोरे सुस्साट तर कुणी 4 मतांनी विजयी; एक मतपत्रिका बाद झाल्याने भवितव्य ईश्वर चिट्टीवर

नेमके काय बदल होणार?

रोजगाराचे स्थैर्य: चार वर्षांच्या सेवेनंतर पुढे काय, असा प्रश्न असलेल्या जवानांना थेट दोन वर्षांचे सेवा-स्थैर्य मिळाले आहे.

आर्थिक लाभ: वाढीव दोन वर्षांत अधिकचे वेतन आणि भत्ते लागू होतील.

कायमस्वरूपी सेवेची संधी: कामगिरीच्या जोरावर लष्कराचे नियमित सैनिक होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. लष्कराची कार्यक्षमता वाढवणे आणि तरुणांना सैन्यदलात दीर्घकाळ सेवा बजावण्याची संधी देणे, या दुहेरी उद्देशाने केंद्रीय मंत्रिमंडळाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.