राज्यातील विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील पाच जागांसाठी झालेल्या निवडणुकीतील निकाल आता जवळपास स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीमध्ये पुणे, छत्रपती संभाजी नगर आणि नागपूरच्या पदवीधर मतदारसंघात राज्यातील सत्ताधारी महायुतीला पदवीधर मतदारांनी जबर दणका दिला असून, तिन्ही ठिकाणी महायुतीच्या उमेदवारांचा पराभव झाला आहे. तर पुणे आणि अमरावती विभागाच्या शिक्षक मतदारासंघात महायुतीचा विजय झाला आहे. विधान परिषदेच्या निवडणूक झालेल्या एकूण पाच मतदारसंघांपैकी तीन ठिकाणी महाविकास आघाडीची सरशी झाली आहे. तर दोन जागा महायुतीच्या खात्यात गेल्या आहेत.
पुणे विभाग पदवीधर मतदारसंघात हर्षदा देशमुख-जाधव विजयी विधान परिषदेच्या पाच जागांपैकी पुणे विभाग पदवीधर मतदारसंघातील अटीतटीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या हर्षदा देशमुख-जाधव यांनी विजय मिळविला. प्रदीर्घ मतमोजणीनंतर ४४ व्या बाद फेरीत विजयासाठी आवश्यक मतांचा कोटा पूर्ण करत त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या स्मिता जाधव यांचा ९ हजार ९२८ मतांनी पराभव केला. हर्षदा देशमुख-जाधव यांना अखेर १ लाख १३ हजार ८४० मते मिळाली, तर स्मिता जाधव यांना १ लाख ३ हजार ९१२ मतांवर समाधान मानावे लागले.
पुणे शिक्षक मतदारसंघामध्ये भाजपाच्या कौस्तुभ गावडे विजयी तर पुणे शिक्षक मतदारसंघामध्ये भाजपाच्या कौस्तुभ गावडे यांनी शिंदेसेना पुरस्कृत अपक्ष उमेदवार सचिन सापन यांचा तब्बल ६ हजार ७७० मतांनी पराभव केला. एकूण वैध मतांमधून २५ हजार ७५६ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला होता. त्यात गावडे यांना निर्धारित मते न मिळाल्याने २७ बाद फेऱ्यांनतर २३ हजार १७७ मते मिळाली. तर त्यांचे प्रतिस्पर्धी सानप यांना १६ हजार ३४७ मते मिळाली. या मतदारसंघातून आजवर निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये गावडे सर्वात तरुण उमेदवार ठरले आहेत.
संभाजीनगर पदवीधर मतदारसंघामध्ये प्रतापसिंह पाटील यांना विजयी आघाडी छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी महायुतीचे विद्यमान आमदार सतीश चव्हाण यांच्याविरुद्ध निर्णायक आघाडी घेत विजय निश्चित केला आहे.
अमरावती शिक्षक मतदारसंघात किरण सरनाईक विजयी
अमरावती शिक्षक मतदारसंघात मात्र महायुतीला दिलासा देणारं यश मिळालं आहे. येथे शिंदेसेनेचे किरण सरनाईक दुसऱ्या पसंतिक्रमाच्या अखेरच्या बाद फेरीत विजयासाठी आवश्यक १६,१३४ मतांचा कोटा पार करीत विजयी झाले. त्यांनी महाविकास आघाडीच्या प्रा. अदिती पोहरे यांचा पराभव केला व मतदारसंघ पुन्हा राखला. पहिल्या पसंतीच्या फेरीपासून सरनाईक यांनी आघाडी घेतली होती. मात्र, विजय साकार करण्यास त्यांना २४ व्या बाद फेरीपर्यंत संघर्ष करावा लागला. मंगळवारपासून तब्बल ३२ तास सुरू असलेल्या या मतमोजणीमध्ये त्यांनी १६,६६३ मते मिळवित विजय साकार केला, तर दुसऱ्या क्रमांकावर पोहरे यांना ८,६३६ मते मिळाली. या निवडणुकीत शिंदेसेनेचे बंडखोर व माजी आमदार श्रीकांत देशपांडे हे ७,०१७ मते मिळवित तिसऱ्या स्थानावर राहिले.
नागपूरमध्ये भाजपाला धक्का, अभिजित वंजारी यांना विजयी आघाडी
राज्यातील सत्ताधारी भाजपासाठी प्रतिष्ठेच्या असलेल्या आणि संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेल्या नागपूर पदवीधर मतदारसंघामध्ये सत्ताधारी भाजपावर पराभवाची नामुष्की ओढवली आहे. येथे पहिल्या पसंतीक्रमाच्या मतमोजणीत आघाडीवर असलेले भाजपाचे सुधाकर कोहळे यांना दुसऱ्या पसंती क्रमाच्या मतमोजणीत धक्का बसला असून, काँग्रेसचे विद्ममान आमदार अभिजित वंजारी यांनी निर्णायक आघाडी घेत विजय निश्चित केला आहे.



