पुणेकरांवर पाणी कपातीचं संकट, पुढील आठ महिन्यासाठी पालिकेचे आज कठोर निर्बंध,’या लोकांना पाणी वापरता येणार नाही…

0

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाण्याचे नियोजन आणि पाण्याचा गैरवापर रोखण्यासाठी पुणे महानगरपालिका आता कठोर पावले उचलण्याच्या तयारीत आहे. पुणेकरांसाठी दर गुरुवारी पाणी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला असून आता जलतरण तलाव, वाहन धुलाई केंद्रे आणि बांधकामांसाठी होणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या वापरावरही निर्बंध घालण्यात येणार आहेत. यासंदर्भात प्रशासनाशी चर्चा झाली असून, उद्या नियमावली तयार केली जाणार असल्याची माहिती पुणे महानगरपालिका स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली.

पाण्याची वाढती गरज आणि दुष्काळामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता पाण्याचा वापर मर्यादित ठेवणे आवश्यक असल्याचे भिमाले यांनी सांगितले. विशेषतः रात्रीच्या वेळी सुरू असलेल्या वॉशिंग सेंटरवर निर्बंध घालण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जलतरण तलावांमध्ये होणारा पाण्याचा वापर आणि वाहन धुलाईसाठी खर्च होणारे पाणी याबाबतही नियम निश्चित केले जाणार आहेत.

अधिक वाचा  विजयादशमीला कोथरूडकरांना मराठी ‘रामलीला’ आणि भव्य ‘रावणदहन’ची पर्वणी; ‘कथा शौर्याची माझ्या श्रीरामाची’ नाट्यप्रयोगालाही उत्स्फूर्त प्रतिसाद

बांधकामांसाठी पिण्याच्या पाण्याचा वापर रोखणार

शहरातील बांधकामांसाठी पिण्याच्या पाण्याचा वापर केला जात असल्याचा मुद्दा उपस्थित करत हा वापर थांबवणे गरजेचे असल्याचे भिमाले यांनी नमूद केले. तसेच शहरात विविध ठिकाणी होणाऱ्या पाणीगळतीवर नियंत्रण मिळवण्याची आवश्यकता आहे. पाणीगळती रोखल्यास पाण्याची बचत होण्यास मदत होईल असेही त्यांनी सांगितले.

या उपाययोजनांसंदर्भात महापालिका प्रशासनासोबत चर्चा करण्यात आली आहे. वॉशिंग सेंटर, जलतरण तलाव, बांधकामांमधील पाण्याचा वापर आणि पाणीगळती या मुद्द्यांवर नियमावली तयार करून पाण्याचा अपव्यय कमी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

‘आताच काटकसर केली तर पुढील आठ महिने पाणी मिळेल’

अधिक वाचा  जरांगेंच्या जाहीर केलेल्या ऑडिओ क्लिपबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; शिष्टमंडळालाही हे आश्वासन?

सध्याच्या दुष्काळी परिस्थितीचा उल्लेख करत भिमाले म्हणाले की, शेतकऱ्यांची परिस्थितीही गंभीर आहे. अशा वेळी पाण्याचे योग्य नियोजन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आताच पाण्याची बचत आणि काटकसर केली नाही तर येत्या काळात मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते असा इशाराही त्यांनी दिला.

‘पाण्याचा अपव्यय टाळला पाहिजे, पाण्याची नासाडी थांबवली पाहिजे आणि पाण्याच्या वापराला मर्यादा आल्या पाहिजेत. आताच काटकसर केली तर पुढील आठ महिने व्यवस्थित जातील’. तसेच पाणी कपात आणि निर्बंधांवर विरोधकांकडून काय प्रतिक्रिया येतात, यापेक्षा पुणे शहर आणि पुणेकरांचे हित महत्त्वाचे असल्याचे भिमाले यांनी स्पष्ट केले.

अधिक वाचा  पुण्यात ७५ किलोमीटर लांबीचे नवे सायकल ट्रॅक उभारणार; महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांचे निर्देश