अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या वतीने पुण्यातील कोथरूड परिसरात छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ते वीर सावरकर उड्डाणपूल(दशभुजा गणपती मंदिर) विद्यार्थ्यांना न्याय मिळावा आणि शिक्षण व्यवस्थेतील गैरप्रकारांविरोधात निषेध नोंदवत भव्य कॅन्डल मार्चचे आयोजन करण्यात आले. या मार्चमध्ये पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप, पुणे महापालिका गटनेते रामचंद्र उर्फ चंदूशेठ कदम स्थानिक नगरसेविका दीपाली ढोख याच्यासह कोथरूड काँग्रेस ब्लॉक पदाधिकारी, युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे हातात तिरंगा ध्वज आणि मेणबत्त्या घेऊन सहभागी नागरिकांनी वन्दे मातरम् गान करत शांततेच्या मार्गाने निषेध व्यक्त केला. NEET पेपर फुटीमुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या छायाचित्रांसह फलक हातात घेऊन “विद्यार्थ्यांना न्याय द्या”, “दोषींवर कठोर कारवाई करा” अशा घोषणा देण्यात आल्या. शिक्षण व्यवस्थेतील उत्तरदायित्व निश्चित करण्याची तसेच संबंधितांवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी यांच्या वतीने करण्यात आली.
या कॅन्डल मार्चदरम्यान वातावरण भावनिक झाले असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षित भविष्यासाठी आणि पारदर्शक शिक्षण व्यवस्थेसाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले. आयोजकांनी हा लढा विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत सुरू राहणार असल्याचे सांगितले.
कोथरूड परिसरातून निघालेल्या या कॅन्डल मार्चमध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. शांततापूर्ण मार्गाने करण्यात आलेल्या या आंदोलनाने परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.



