रुपाली चाकणकरांनी ईडीकडून आठ तास चौकशीनंतर दिली पहिली प्रतिक्रिया, खरातसोबतच्या गुवाहाटी दौऱ्यावरही केलं स्पष्टीकरण

0

नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याच्याशी असलेल्या जवळीकतेमुळे महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागलेल्या रुपाली चाकणकर यांची गुरूवारी ईडीने तब्बल आठ तास चौकशी केली.या चौकशीत रुपाली चाकणकर आणि त्यांच्या कुटुंबाचे अशोक खरात याच्याबरोबर काही आर्थिक संबंध आहेत का? चाकणकर-खरात यांनी भागिदारीत काही मालमत्ता घेतल्या आहेत का? अशा अनुषंगाने ईडीने रुपाली चाकणकर यांच्यावर प्रश्नांचा मारा केला. परंतु आमच्या कुटुंबाचे अशोक खरात याच्यासोबत कोणतेही आर्थिक संबंध नव्हते आणि आमच्यात जमिनीचे देखील व्यवहार झालेले नाहीत, असे चौकशीनंतर रुपाली चाकणकर यांनी स्पष्ट केले.

सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीकडून रुपाली चाकणकर यांनी तब्बल आठ-साडे आठ तास चौकशी झाली. अशोक खरात याच्यासोबत चाकणकर यांच्या कुटुंबाचे आर्थिक संबंध आणि कोटींच्या जमिन खरेदी झाल्याचे आरोप विरोधकांकडून झाले होते. याच पार्श्वभूमीवर रुपाली चाकणकर यांना ईडीने समन्स पाठवून आज गुरूवारी चौकशीसाठी बोलावले होते. रुपाली चाकणकरांची सकाळी ११ वाजता सुरू झालेली चौकशी बरोबर सात वाजता संपली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधून ईडी चौकशीचा तपशील सांगितला.

अधिक वाचा  शासन आदेश ३०४ दुष्काळी तालुक्यांमध्ये जलसंधारणालाच प्राधान्य; प्रत्येक गावात १०० जलशोषक खड्डे, नाले खोलीकरण

ईडी चौकशीनंतर रुपाली चाकणकरांची पहिली प्रतिक्रिया

ज्या ज्या वेळी आम्हाला चौकशीसाठी बोलावले तेव्हा तेव्हा आम्ही चौकशीला हजर राहिलेलो आहे. बहीण प्रतिभा चाकणकर आणि आणि पुतण्या देखील चौकशीसाठी शिर्डी पोलीस स्टेशनला गेले होते. आज मला ईडीने चौकशीसाठी बोलावले होते. आठ तासांच्या चौकशीत प्रत्यक्ष चौकशी साडे तीन-चार तासांचीच झाली. बाकी वेळ जबाब घेणे, लंच, टाईप करणे असे काम झाले, असे चाकणकर यांनी सांगितले.

महत्त्वाचे म्हणजे पहिल्या दिवशी जे सांगितले तेच मी पुन्हा ईडीला देखील सांगितले. अशोक खरातबरोबर आमचा कोणताही आर्थिक व्यवहार नाही, संबंध नाही. कोणत्याही जमीन व्यवहारात आम्ही पार्टनर नाही, असे रुपाली चाकणकर यांनी ईडीला सांगितले. ईडीने आर्थिक व्यवहाराच्या दृष्टीनेच प्रश्न विचारले, पण आम्ही कुठेच पार्टनर नसल्याचे किंवा आमचा आर्थिक व्यवहार झाला नसल्याने पुढील प्रश्न उद्भवले नाही, असेही चाकणकर यांनी आवर्जून सांगितले. बाकी प्रश्न काय विचारले हे अहवालात सगळे येईलच की… असे माध्यम प्रतिनिधींना चाकणकर म्हणाल्या.

अधिक वाचा  शिवसेना शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला फडणवीसांचा हा शब्द, जरांगेंकडून शेअर ऑडिओ क्लिपच्या चौकशीची मागणी

खरातसोबतच्या गुवाहाटी दौऱ्यावरही स्पष्टीकरण

खरातसोबतच्या गुवाहाटी दौऱ्यावरही रुपाली चाकणकर यांनी स्पष्टीकरण दिले. चाकणकर म्हणाल्या, अशोक खरात आणि आमच्या कुटुंबाचा गुवाहाटीचा फोटो प्रसिद्ध होत आहे. माझ्या फॅमिलीसोबत खरातची फॅमिली आहे. त्याच्यासोबत आम्ही प्रवास केलेला नाही. खरात त्याच्या फॅमिलीसोबत, अनेक ट्रस्टी मेंम्बर्सबरोबर गुवाहाटीला गेला होता. त्यानंतर आम्ही तिथे पोहोचलो. त्यावेळी आमचा भाव असा होता की आपल्याला आपल्या गुरूबरोबर दर्शन करायला मिळते आहे, तो अध्यात्मिक भाव होता. आम्ही पुण्यावरून प्रवास करून गेलो होतो. तिथे सोबत आम्ही दर्शन केले. त्यानंतर त्यांचा प्रवास त्यांच्या लोकांसोबत होता. खरात अनेक लोकांबरोबर, तिथे दर्शनासाठी आलेला होता.

अधिक वाचा  गोकुळचा पराभव जिव्हारी? महायुतीने पुन्हा एकदा दंड थोपटले? अध्यक्षपद रणनीती विधान परिषद निकालानंतरच ठरणार

अशोक खरात याला १७ तारखेला अटक केल्यानंतर तो आरोपी आहे, हे आम्हाला कळाले. तोपर्यंत आम्ही जसे त्याला गुरू मानले तसे अनेक क्षेत्रातील अनेक मान्यवर त्याला गुरू मानत होते. आम्ही प्रामाणिक श्रद्दा ठेवली होती, असे सांगताना केवळ आम्हीच त्याला गुरू मानत नव्हतो, असे अप्रत्यक्षपणे रुपाली चाकणकर यांनी सांगण्याचा प्रयत्न केला.

समता पतसंस्थेत बहीण प्रतिभा चाकणकरांचे खाते कसे काय? रुपाली चाकणकर म्हणाल्या…

शिर्डीच्या समता पतसंस्थेत बहीण प्रतिभा चाकणकर आणि पुतण्या तन्मय चाकणकर यांच्या नावे बनावट खाती काढण्यात आली होती. त्याचा ओटीपी अशोक खरात याच्याकडेच जात होता. समता पतसंस्था कुठे आहे, हे देखील त्यांना (कुटुंबाला) माहिती नव्हती. अशोक खरात याने शेकडो लोकांची बनावट खाती काढली होती तसे माझ्या बहिणीचे देखील बनावट खाते काढण्यात आले होते, असे स्पष्टीकरण चाकणकर यांनी दिले.