पुणे महापालिका आयुक्तांचे 2026-27 आर्थिक वर्षासाठी 14 हजार कोटीचे अंदाजपत्रक सादर, ‘ही’ आहेत मुख्य वैशिष्ट्ये…

0

पुणे महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी 13 हजार 995 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक स्थायी समितीसमोर सादर केले. शहराच्या सर्वांगीण विकासाबरोबरच महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांच्या विकासावर या अंदाजपत्रकात विशेष भर देण्यात आला आहे. रस्ते विकास, पर्यावरण संवर्धन, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारणा तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी गृहनिर्माण प्रकल्पांना प्राधान्य देण्यात आले आहे. मात्र महापालिकेला उत्पन्नाचे शाश्वत स्रोत निर्माण करण्यात अद्याप यश आले नसून शासकीय अनुदान, कर्ज आणि पारंपरिक उत्पन्न स्रोतांवरच महापालिकेचा आर्थिक बोजा अवलंबून असल्याचे चित्र आहे. प्रथमच लोकनियुक्त स्थायी समितीसमोर महापालिका आयुक्तांनी सोमवारी (ता.9) अंदाजपत्रक सादर केले. यावेळी महापौर मंजूषा नागपुरे, सभागृहनेते गणेश बिडकर, स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

अधिक वाचा  भाजपाचे पदवीधर, शिक्षक मतदार संघासाठी पुण्यावर विशेष लक्ष; कारवाईच्या भीतीने नगरसेवकांचा मतदारांशी संपर्क?

यावेळी बोलताना आयुक्त राम यांनी सांगितले की, महापालिका हद्दीत नव्याने 21 गावांचा समावेश झाल्याने आता नियोजन प्राधिकरण म्हणून महापालिकेची जबाबदारी वाढली आहे. जुन्या शहर भागाप्रमाणेच समाविष्ट गावांचाही नियोजनबद्ध विकास होणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर अंदाजपत्रकात या गावांच्या विकासासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे. गावांचा विकास वेळेत झाला नाही तर शहराचा विकास असमतोल होऊन बकालपणाची शक्यता निर्माण होऊ शकते, त्यामुळे समाविष्ट गावांच्या विकासाला विशेष प्राधान्य दिले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अंदाजपत्रकातील महत्वाच्या योजना

  • कात्रज-कोंढवा रस्ता: या महत्त्वाच्या रस्त्याच्या विकासासाठी 100 कोटी रुपयांची स्वतंत्र तरतूद करण्यात आली आहे.
  • शहरातील एकूण 32 ‘मिसिंग लिंक’ रस्त्यांपैकी 12 लिंक्स यावर्षी ताब्यात घेऊन विकसित करण्याचे नियोजन आहे.
  • महामेट्रोच्या सहकार्याने 2034 पर्यंतचा भविष्यातील विचार करून उड्डाणपूल आणि पुलांचे नियोजन केले जाणार आहे.
  • वाहतूक डेटा विश्लेषणासाठी Aआणि पार्किंग व्यवस्थापनासाठी जीआयएस तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल.
  • शहरासाठी नवीन 1000 ई-बसेसचा ताफा
  • बीआरटी स्थानकांवर सुरक्षारक्षक, सीसीटीव्ही कॅमेरे आणि वॉटर जेट मशीनद्वारे स्वच्छतेचे नियोजन करण्यात येणार
  • मुळा-मुठा’ नदी संवर्धनासाठी मैलापाणी शुद्धीकरण केंद्रांची क्षमता सध्याच्या 473 एमएलडी वरून वाढवून ती जवळपास दुप्पट करण्याचे उद्दिष्ट
  • कोंढवा खुर्द येथे 3.8 एकर जागेवर ‘नेचर बेस्ड फॅमिली पार्क’ विकसित केले जाणार
  • हवेची गुणवत्ता मोजण्यासाठी शहरात ‘एअर क्वालिटी मॉनिटरिंग सेन्सर्स’ बसवण्यात येतील.
  • देवाची उरुळी येथील 10 लाख मे. टन कचर्‍यावर प्रक्रिया करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून, रिजेक्ट वेस्टवर प्रक्रिया करण्यासाठी हडपसर येथे नवीन प्रकल्प उभारला जाईल.
  • महिला आणि तृतीयपंथीयांसाठी विशेष सोयींनी युक्त ‘स्मार्ट पब्लिक टॉयलेट्स’ विविध झोनमध्ये उभारली जाणार आहेत.
  • बालेवाडी, हडपसर आणि इतर भागात 4700 घरांचे नियोजन असून नवीन प्रकल्पांसाठी 35 कोटींची तरतूद आहे.
  • शहरातील ऐतिहासिक नाट्यगृहाचे आधुनिकीकरण आणि पुनर्विकास करण्याचे प्रस्तावित आहे.
  • शहरातील 75 शाळांना ‘आदर्श शाळा’ म्हणून विकसित केले जाणार
अधिक वाचा  पुणे पदवीधर निवडणूक : हर्षदा देशमुखांनी पाहिल्या फेरीतच विजय आणला दृष्टीक्षेपात; कोटापूर्तीस अवघ्या ७३६ मतांची गरज! लादलेल्या उमेदवारीबाबत कार्यकर्त्यांचा स्पष्ट संदेश?