पुण्यात दिवाळी पहाट कार्यक्रमातच ख्यातनाम मृदंगवादकाची प्राणज्योत मालवली हृदयविकाराचा झटका अखेरचे दुःखद क्षण प्रेक्षक महिलेकडून व्यक्त

0

कर्नाटक शास्त्रीय संगीत क्षेत्रातील ख्यातनाम मृदंगवादक श्रीधर पार्थसारथी यांचे शुक्रवारी पुण्यात निधन झाले. वयाच्या अवघ्या ५६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बाणेर येथे एका दिवाळी पहाट मैफलीदरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला, त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांचे प्राण वाचविण्यात यश आले नाही.

दिग्गज कलाकारांना मृदंगाची साथ

श्रीधर पार्थसारथी यांनी वयाच्या सहाव्या वर्षी संगीताचे धडे घेण्यास सुरुवात केली. प्रसिद्ध गुरू विद्वान कारैकुडी आर. चंद्रमौळी यांच्याकडे त्यांनी मृदंगाचे शिक्षण घेतले. प्रदीर्घ सांगीतिक कारकिर्दीत त्यांनी डी. के. पट्टम्मळ, विद्वान मदुराई जी. एस. मणी, डॉ. एम. बालमुरलीकृष्ण आणि विद्वान रंगनाथ शर्मा यांसारख्या दिग्गज कलाकारांना मृदंगाची साथ केली.

शा0स्त्रीय संगीताबरोबरच विविध संगीतप्रकारांतील प्रयोगांमध्येही त्यांचा सक्रिय सहभाग होता. हरहुन्नरी गायक शंकर महादेवन, संजीव अभ्यंकर, रतनमोहन शर्मा आणि नंदकिशोर मुळे यांच्यासोबत त्यांनी जुगलबंदी सादर केली होती. नामवंत संगीतकारांसोबतही त्यांनी काम केले.

अधिक वाचा  पुणे विभागाचे शिक्षण उपसंचालक विभागाचे आदेश अन् पुणेकर पालकांचे टेन्शन वाढलं; नामांकित संस्थेच्या १० शाळांची मान्यता रद्द

भारतीय तालवादन क्षेत्रात वेगळे स्थान

प्रसिद्ध संगीत निर्माते बॉब बेल्डन यांच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील ‘माइल्स फ्रॉम इंडिया’ या अल्बममध्येही त्यांचे योगदान होते. तालावरील विलक्षण प्रभुत्व, प्रयोगशीलता आणि विविध संगीतपरंपरांशी जुळवून घेण्याची क्षमता यांमुळे त्यांनी भारतीय तालवादन क्षेत्रात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले होते.

शंकर महादेवन यांना भावना अनावर

दरम्यान, शंकर महादेवन यांनी श्रीधर पार्थसारथी यांच्या निधनानंतर इन्स्टाग्रामवरुन शोक व्यक्त केला आहे. “हे पचवणेच अशक्य आहे! माझ्यासाठी आणि संपूर्ण संगीत विश्वासाठी ही एक मोठी हानी आहे!आमचे अत्यंत लाडके श्रीधर पार्थसारथी – जे सर्वोत्तम मृदंगवादकांपैकी एक आणि एक विलक्षण संगीतकार होते – त्यांच्या जाण्याने आम्ही पूर्णपणे हादरलो आहोत!”

“सुमारे ४० वर्षांपूर्वी माझा पहिला कर्नाटक शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम झाला, तेव्हा मृदंगावर श्रीधरच होता! आम्ही संगीताच्या मैफिलींत, गप्पागोष्टींत आणि मनमोकळ्या हास्यात कितीतरी तास आणि दिवस एकत्र घालवले आहेत! एका मैफिलीत वादन करत असतानाच त्यांचे निधन झाले!! कल्पना करु शकता का? या जगाचा निरोप घेण्याची किती विलक्षण पद्धत! देव त्यांच्या कुटुंबाचे रक्षण करो आणि त्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो! खूप प्रेम, श्रीधर!” अशा शब्दात शंकर महादेवन यांनी भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे.

अधिक वाचा  तुकाराम मुंढे यांना मोठा झटका थेट एफडीएचा हा आदेश रोखला; पुण्यातील रांजणगावची ही राजाश्रयाची कंपनी ठरली कारणीभूत

रसिक प्रेक्षकाने काय सांगितलं?

शंकर महादेवन यांच्या इन्स्टा पोस्टवरील कमेंटमध्ये कल्याणी टोकेकर नामक महिलेने हे दृश्य प्रत्यक्ष पाहिल्याचा दावा केला आहे. “हे प्रत्यक्ष पाहणे अत्यंत धक्कादायक होते… अवघ्या ५ मिनिटांपूर्वी ते आनंदाने मृदंग वाजवत होते, त्यांच्या चेहऱ्यावर अस्वस्थतेची कोणतीही खूण नव्हती. त्यानंतर पूर्वायन यांनी घोषणा केली की पहिल्या सत्राच्या समाप्तीला १५ मिनिटे बाकी असताना ते दोन भजने सादर करतील. श्रीधर यांनी एक मृदंग बाजूला ठेवून दुसरा बाहेर काढला, सर्वजण आपापली वाद्ये सज्ज करत असतानाच ते आमच्यासमोर पडले; नेमके काय घडत आहे हे कोणाला समजण्याआधीच ते पूर्णपणे कोसळले होते.”

अधिक वाचा  महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे दुष्काळासह विविध मुद्द्यांवर १२ मोठे निर्णय! हे सर्वांगीण महत्त्वाचे निर्णय फक्तं गोकुळमुळे झाकोळले; वाचा सविस्तर

 “प्रेक्षकांमध्ये उपस्थित असलेले डॉक्टर काही सेकंदातच मंचावर धावून आले. त्यांनी १६-१७ मिनिटे सीपीआर दिला, रुग्णवाहिकाही आली. वैद्यकीयदृष्ट्या जे काही शक्य होते, ते सर्व प्रयत्न करण्यात आले, परंतु ते वाचू शकले नाहीत. ज्या कलेसाठी ते ओळखले जात होते, ती कला सादर करत असतानाच त्यांनी या जगाचा निरोप घेतला. मात्र, दिवाळीच्या दिवशी झालेला हा अचानक मृत्यू अत्यंत धक्कादायक आहे.” अशा भावना कल्याणी टोकेकर यांनी पोस्टच्या कमेंटमध्ये व्यक्त केल्या आहेत.