शरद पवार यांची प्रकृती बिघडली, तातडीने कार्डियाक अ‍ॅम्ब्युलन्ससह ताफा रवाना; पुण्यातून एअरलिफ्टिंग करण्याची शक्यता

0

राज्यभरात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या निकालाची लगबग सुरू असताना मूळ राष्ट्रवादीचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर येत आहे. त्यांचे निवासस्थान असलेल्या गोविंद बागेतून ते पुणे शहराच्या दिशेने निघाले आहेत. सध्या प्राथमिक उपचारासाठी पुण्यामध्ये पोहोचण्याची धावपळ सुरू झाली असली तरी सुद्धा मुख्यतः शरद पवार यांच्या वरती उपचार करणारी सर्व तज्ञ मंडळी मुंबईमध्ये असल्यामुळे पुण्यातून एअरलिफ्टने मुंबईत हलवण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांची प्रकृती बरी नाही. दोन ते तीन महिन्यांपासून अनेक सार्वजनिक कार्यक्रमही त्यांनी टाळले. परंतु अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर त्यांनी पुन्हा जनतेच्या भेटीगाठी घ्यायला सुरुवात केली. गेल्या आठवड्यातील तीन दिवस ते अजित पवार यांचे निवासस्थान असलेले सहयोग सोसायटीमध्ये होते. गत सप्ताहात प्रचंड दगदग झाल्याने तब्येतीवर परिणाम झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

अधिक वाचा  पुणे पदवीधरमध्ये सोलापूर, शिक्षकमध्ये सातारा आघाडीवर शिक्षक मतदारसंघ ८५.८७ तर पदवीधर ६२.७८ टक्के मतदान

शरद पवार यांना काहीसे अस्वस्थ वाटू लागल्याने सोमवारी दुपारी त्यांच्या ताफा कार्डियाक अॅम्ब्युलन्ससह पुण्याच्या दिशेने रवाना झाला. तेथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात येतील, अशी प्राथमिक माहिती कळते आहे.

शरद पवार यांना नेमकं काय झालंय?

शरद पवार यांना खोकला आणि कफ आहे. त्यामुळे त्यांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. शरद पवार मास्क लावून वेगळ्या गाडीने पुण्याकडे रवाना झाले आहेत. शरद पवारांच्या वैद्यकीय तपासणीसाठी डॉक्टरांचे पथक सकाळपासूनच गोविंदबागेत दाखल झाले होते. सुमारे तासभर तपासणी केल्यानंतर त्यांना पुण्याला उपचारासाठी जाण्याच्या सूचना डॉक्टरांनी दिल्या.

अधिक वाचा  जरांगेंच्या जाहीर केलेल्या ऑडिओ क्लिपबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; शिष्टमंडळालाही हे आश्वासन?

शरद पवार यांना प्रचंड थकवा

अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर पवार कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी राज्यभरातून नेते पदाधिकारी बारामतीला येत आहेत. सहयोगला जाऊन दादांच्या कुटुंबातील सदस्यांची भेट घेऊन संबंधित सगळेच जण गोविंदबागेक शरद पवार यांची भेट घेण्याकरिता जात आहेत. जवळपास आठ दिवस हा दिनक्रम सुरू असल्याने शरद पवार यांना प्रचंड थकवा आल्याचे सांगण्यात येते.