प्रवाशांना दिवाळीचा मोठा झटका! एसटीचेही तिकीट 10% महागले; ॲडव्हान्स बुकिंगसाठी हे महत्त्वाचा नियम

0

राज्यभरातील लाखो प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. दिवाळीतील गर्दीच्या हंगामात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) एसटी बसचे तिकीट 10 टक्क्यांनी वाढणार आहे. ही भाडेवाढ 15 ऑक्टोबर ते 05 नोव्हेंबर 2025 पर्यंत तब्बल 22 दिवस लागू राहील. विशेष म्हणजे, ज्या प्रवाशांनी ॲडव्हान्स बुकिंग केले आहे, त्यांना देखील जुना आणि नवीन दरातील फरक वाहकाकडे जमा करावा लागेल, असे परिपत्रक MSRTC ने जारी केले आहे.

किती दिवस भाडेवाढ लागू?

15 ऑक्टोबर 2025 पासून ही भाडेवाढ लागू होईल आणि ती 05 नोव्हेंबर 2025 पर्यंत कायम राहील. म्हणजेच तब्बल 22 दिवस ही दरवाढ तिकीट दरांवर परिणाम करणार आहे. सर्वसामान्य साधी, जलद बससेवांसोबतच निमआराम, साधी शयनयान (स्लीपर), शिवशाही आणि जनशिवनेरी यांसारख्या लोकप्रिय सेवांवर ही दरवाढ लागू होणार आहे.

अधिक वाचा  विधान परिषदेच्या 5 जागांसाठी आज मतमोजणी शिक्षक- पदवीधरांचा आमदार कोण? कुणाचा गुलाल उधळणार?

प्रवाशांसाठी महत्त्वाचे बदल आणि नियम

प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करताना खालील बाबी लक्षात घेणे आवश्यक आहे:

लागू होण्याची वेळ: 15 ऑक्टोबर 2025 रोजी मध्यरात्री 00.00 वाजल्यापासून प्रवास सुरू करणाऱ्या प्रवाशांना वाढीव दर लागू होतील.

ॲडव्हान्स बुकिंग : ज्या प्रवाशांनी आधीच तिकीट बुक केले आहे, त्यांना वाहकाकडे जुना आणि नवीन तिकीट दर यातील फरक जमा करावा लागेल.

पासेस आणि सवलत: विद्यार्थी पासेस आणि मासिक-त्रैमासिक पासेस वापरणाऱ्यांना ही भाडेवाढ लागू होणार नाही. मात्र, इतर सामाजिक घटकांना मिळणाऱ्या सवलतीच्या तिकीटांसाठी देखील ही 10 टक्क्यांची दरवाढ लागू असेल.

अधिक वाचा  शिक्षक मतदारसंघातील मतदानादरम्यान उमेदवार ढसाढसा रडला, सर्व व्यवस्थेवरचा विश्वास उडालाय, मी इस्लाम स्वीकारणार

कोणत्या प्रवासाला दिलासा?

प्रवाशांना दिलासा देणारी बाब म्हणजे वातानुकूलित शिवनेरी (Shivneri AC), 09 मीटर आणि 12 मीटर ई-बसेस (शिवाई) (E-Buses – Shiwai) या सेवांच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. या बसच्या दरात वाढ न झाल्याने या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.