मंत्री महोदयांच्या डोक्याला ट्रकचा रॉड लागला; रक्तस्राव होत असतानाही वीर जवानाला पुष्पचक्र अर्पण;सर्वांची धावपळ

0

देशसेवा बजावत असताना वीरमरण आलेल्या वरणगाव येथील अर्जुन बाविस्कर यांच्या पार्थिवाचे दर्शन घेताना मंत्री गिरीश महाजन यांच्या डोक्याला लोखंडी रॉड लागल्याने दुखापत झाली आहे.या दुखापतीनंतर जखमी अवस्थेतच मंत्री महोदयांना वरणगाव येथील निमजाय हॉस्पिटल येथे नेण्यात आले, तेथे त्यांनी प्राथमिक उपचार घेतल्यानंतर ते वीर जवान अर्जुन बाविस्कर यांच्या अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. त्यानंतर, महत्त्वाची बैठक असल्याने ते पुढे नाशिककडे रवाना झाले आहेत. दरम्यान, मंत्री महोदयांच्या डोक्याला इजा झाल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांची काहीवेळ धांदल उडाली होती.

वरणगाव येथील वीरगती प्राप्त झालेले जवान अर्जुन लक्ष्मण बाविस्कर यांना मानवंदना देण्यासाठी जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन आज वरणगाव शहरात आले होते. वीर जवान अर्जुन बाविस्कर यांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी मिल्ट्रीच्या ट्रॅकमध्ये चढले असताना ट्रॅकचा वरचा लोखंडी रॉड त्यांच्या डोक्याला लागला. त्यानंतर, डोक्यातून रक्तस्राव होत असतानाही गिरीश महाजन यांनी वीर जवान अर्जुन बाविस्कर यांच्या पार्थिव देहाला पुष्पचक्र अर्पण करत अभिवादन केले.

अधिक वाचा  एकनाथ शिंदेंचं 500 कोटींच्या बॉम्बवरुन जरांगेंना प्रतिआव्हान; म्हणाले, पुरावे द्या, दूध का दूध पानी का पानी होईल

मात्र, डोक्याचे रक्त थांबत नसल्याने उपस्थित माजी नगराध्यक्ष सुनील काळे, कामगार नेते मिलिंद मेढे, भाजपा शहराध्यक्ष सुनील माळी, शेख आखलाक यांनी आग्रह करुन प्राथमिक उपचारासाठी त्यांना तातडीने जवळील हॉस्पिटलमध्ये नेले. रुग्णालयात डॉ. निलेश पाटील यांनी त्यांच्यावर उपचार केले. त्यानंतर, गिरीश महाजन यांनी वीर जवान अर्जुन बाविस्कर यांच्या परिवाराला भेट देत सांत्वन केले. तसेच, काळजी करू नका देशसेवा करीत असतांना अर्जुनला वीरमरण आले याचे दुःख आमच्या मनात आहे. मात्र, मी व राज्य सरकार बाविस्कर परिवाराच्या दुःखात सहभागी आहे, असे अभिवचन महाजन यांनी दिले.

अधिक वाचा  पुणे पदवीधरमध्ये सोलापूर, शिक्षकमध्ये सातारा आघाडीवर शिक्षक मतदारसंघ ८५.८७ तर पदवीधर ६२.७८ टक्के मतदान

दरम्यान, गिरीश महाजन यांच्या डोक्याला मार लागला असतांना सुद्धा पुढे अंत्ययात्रेत तिरंगा सर्कल पर्यंत ते चालत गेले, तिथे हजारो वरणगावकरांच्या उपस्थित मानवंदना दिली, त्यानंतर नाशिक येथे महत्वाची बैठक असल्याने मला जावे लागणार आहे, असे सांगून त्याच स्थितीत मंत्री गिरीश महाजन तातडीने वाहनाने नाशिककडे रवाना झाले.