चांदणी चौकातून कोथरूडच्या मुख्य मार्गावर बसेस, जड वाहनांना बंदी; डुक्कर खिंड, वारजे जंक्शनमार्गे पर्यायी वाहतूक

0

पुणे – पौड रस्त्यावरील वनाज ते चांदणी चौक दरम्यान मेट्रोच्या कामामुळे चांदणी चौकातून कोथरूडकडे येणाऱ्या जड वाहनांसह एसटी आणि खासगी प्रवासी बसेसना वाहतूक पोलिसांनी तात्पुरती बंदी घातली आहे. या मार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी चांदणी चौक- डुक्कर खिंड- वारजे जंक्शनमार्गे पर्यायी वाहतूक वळविण्यात आली आहे.

कोथरूड परिसरात पौड रस्त्यावर वनाज ते चांदणी चौक दरम्यान मेट्रोचे काम सुरू आहे. यासाठी रस्त्यावरील दुभाजकाच्या दोन्ही बाजूस बॅरिकेडिंग करण्यात येत आहे. चांदणी चौकातून कोथरूड डेपोकडे येतान रस्ता अरुंद असून, तीव्र उतार आहे. त्यामुळे या मार्गावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रथमेश ईलाईट सोसायटीसमोरील रस्त्यावर ‘हाईट बॅरिकेड’ बसविण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर, पोलिस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी मंगळवारी (ता. २७) हा आदेश काढला आहे. त्यानुसार हायवा, डंपर, मिक्सर, ट्रकसह सर्व जड वाहने, एसटी बसेस आणि खासगी प्रवासी बसेस यांना चांदणी चौकातून कोथरूडकडे येण्यास बंदी राहील. अत्यावश्यक सेवेतील वाहनांना या निर्बंधातून वगळले आहे.

अधिक वाचा  दुसरी पसंती ठरवणार पुण्याचा शिक्षक आमदार, नेमकं गणित काय? निकालाआधीच सोप्या शब्दात समजून घ्या

असा असेल पर्यायी मार्ग –

चांदणी चौकातून कोथरूडकडे जाणाऱ्या वाहनांनी चांदणी चौक – डुक्कर खिंड – वारजे जंक्शन – आंबेडकर चौक – वनदेवी चौक आणि पुढे कर्वे रस्ता-पौड फाटामार्गे इच्छित स्थळी जावे. या वाहतूक बदलांबाबत नागरिकांच्या काही सूचना किंवा हरकती असल्यास त्यांनी येरवडा पोस्ट ऑफिसजवळील पोलिस उपायुक्त (वाहतूक नियंत्रण शाखा) यांच्या कार्यालयात १० नोव्हेंबरपर्यंत लेखी स्वरूपात कळवाव्यात. नागरिकांच्या सूचनांचा विचार करून अंतिम आदेश काढण्यात येणार असल्याचे वाहतूक विभागाने स्पष्ट केले आहे.