मूंढर दि. ९ (रामदास धो गमरे) “सेवा संकल्प अभियान” अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या बीटस्तरीय निबंध स्पर्धेत जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, मूंढर नं. १ येथील गुणवंत विद्यार्थी कु. आर्यन निलेश गमरे याने प्रथम क्रमांक पटकावून जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, मूंढर नं. १ या शाळेच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील कामगिरीत आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.
सदर उल्लेखनीय यशाबद्दल आयोजित गुणगौरव कार्यक्रमात आर्यनला मान्यवरांच्या शुभहस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करून त्याच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
आर्यनच्या या यशामागे त्याचे मार्गदर्शक शिक्षक, मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समिती तसेच पालकांचे मोलाचे योगदान असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेकडून राबविण्यात येणारे विविध उपक्रम आणि शिक्षकांचे मार्गदर्शन यामुळे विद्यार्थ्यांना आपले कौशल्य सिद्ध करण्यासाठी व्यासपीठ मिळत आहे. आर्यनच्या या दैदिप्यमान यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षकवृंद, शाळा व्यवस्थापन समिती, समस्त ग्रामस्थ आणि पालकांनी आर्यनचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून त्याच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.



